शुद्धीकरण न होताच होतो पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:17 AM2017-08-05T00:17:05+5:302017-08-05T00:20:48+5:30
लोणार : अनेक गावातील पाण्याचे शुद्धीकरण न होताच सध्या पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य साथरोगाची स्थिती निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : अनेक गावातील पाण्याचे शुद्धीकरण न होताच सध्या पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य साथरोगाची स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हास्तरीय पथक तसेच आरोग्य कर्मचार्यांनी गावांतील पाणीपुरवठा योजना, स्रोतातून नमुने गोळा करून त्याची त पासणी जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत केली पाहिजे. पाणी नमुने तसेच ब्लिचिंग पावडरचीही तपासणी झाली पाहिजे; परंतु आरोग्य विभागाकडून कुठल्याच प्रकारची तपासणी होत नसल्याने नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. ब्लिचिंग पावडरची गुणवत्ता कमालीची घसरलेली असल्यामुळे त्यामध्ये क्लोरिनचे प्रमाण २0 टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचे दिसून येते. तसेच अनेक ग्रामपंचायतींमध्ये ब्लिचिंग पावडरच उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आली आहे. पावसाळ्याच्या दिवसात ग्रामस्थांना ब्लिचिंग पावडरने निर्जंंतूक केलेल्या शुद्ध पाण्याचा पुरवठा होणे आवश्यक आहे, मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
या गावांमध्ये अशुद्ध पाणी पुरवठा
लोणार तालुक्यातील वझर आघाव, खापरखेड, खळेगाव, शिवनी जाट, पार्डी सिरसाट गावांमध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या गावांमध्ये सातत्याने जलजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामध्ये सर्दी, खोकला, ताप, पोटदुखी, हगवण, अतिसार, विषमज्वर या आजारांच्या रोग्यांचा समावेश आहे. या आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी पाणी शुद्धीकरणाचे निर्देश देण्यात आले आहेत.
पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजारांपासून ग्रामस्थांचे रक्षण व्हावे, यासाठी ग्रामपंचायतींना खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले. गावात शुद्ध पाणीपुरवठा झाल्यास या रोगांना प्र ितबंध होतो.
- डॉ.अनंत पबितवार,
तालुका आरोग्य अधिकारी, लोणार.