पाणीपुरवठय़ाची टाकी कोसळली
By admin | Published: July 13, 2014 11:33 PM2014-07-13T23:33:01+5:302014-07-13T23:33:01+5:30
चाचणीवेळीच घडली घटना
मलकापूर : तालुक्यातील वडोदा या सुमारे ५ हजार लोकसंख्येच्या गावासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून निर्माणाधीन २ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलसाठय़ाची टाकी पाणी पुरवठय़ाआधीच पत्त्याच्या इमारतीसारखी कोसळल्याची घटना आज १३ जुलै रोजी सकाळी ६ वाजता घडली. यामुळे या टाकीच्या बांधकामाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यामध्ये विविध ठिकाणी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या टाकी व जलशुद्धीकरणाची कामे सुरू आहेत. त्यातच वडोदा येथेसुद्धा सन २0१२ मध्ये २ कोटी रुपयांच्या आसपास असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या माध्यमातून १ लाख लीटर क्षमतेच्या पाणी टाकीचे व जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू आहे. त्या टाकीचे काम पूर्ण झाल्यानंतर आज टेस्टिंग करणे सुरू होते. त्यामध्ये टाकी पाण्याने अर्धी भरल्यानंतर अचानक पत्त्यासारखी कोसळली. या घटनेची माहिती होताच गावामध्ये एकच खळबळ उडून नागरिकांनी कोसळलेल्या पाण्याच्या टाकीकडे धाव घेतली. सदर पाण्याची टाकी ही टेस्टिंग सुरू असतानाच व नवीन बांधकाम असतानासुद्धा अचानक कोसळल्याने उपस्थितांमध्ये एकच चर्चा सुरू होऊन उपस्थिांमधून या टाकीच्या बांधकामाबाबत शंका-कुशंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत. या घटनेची माहिती तालुक्यात पसरल्यानंतर जि.प. सदस्य सोपानराव साठे, काँग्रेस पक्षनेते शिवचंद्र तायडे, राकाँ जिल्हा सरचिटणीस संतोषराव रायपुरे, अँड. हरीश रावळ, जि.प. सदस्य वसंतराव भोजने, शिवसेना तालुका प्रमुख अरुण अग्रवाल, शहरप्रमुख किशोर नवले, पं.स. सदस्य विद्या नारखेडे आदींनी भेटी दिल्या. गुणवत्ता नियंत्रक विभाग अकोला यांनी या बांधकामाबाबत चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे वडोदा येथेच मागील ३0 वर्षांपूर्वी असाच पाण्याची टाकी पाडण्याचा एक प्रकार घडला होता. या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अँड. हरिष रावळ यांनी केली आहे.