उन्हाची काहिली; ‘ज्ञानगंगा’तील ५४ पाणवठे वन्यप्राण्यांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 01:54 PM2019-04-15T13:54:11+5:302019-04-15T13:54:53+5:30
बुलडाणा : वन्यप्राण्यांची तहान भागवण्याकरिता वन्यजिव विभागाने ज्ञानगंगा अभयारण्यात ५४ पाणवठे उभारले आहेत.
- सोहम घाडगे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : वन्यप्राण्यांची तहान भागवण्याकरिता वन्यजिव विभागाने ज्ञानगंगा अभयारण्यात ५४ पाणवठे उभारले आहेत. पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी टाकण्यात येत असून वन्यप्राण्यांना पाणवठ्यांचा आधार मिळाला आहे. वाढत्या उन्हाच्या पृष्ठभूमीवर वन्यप्राण्यांच्या अवस्थेबाबत 'लोकमत'ने रविवारी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत ही वस्तूस्थिती आढळली.
बुलडाण्याचे तापमान चाळीसपार पोहोचले आहे. थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असलेले बुलडाणा शहर तापायला लागले आहे. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे घसा कोरडा पडत आहे. तहान भागविण्यासाठी नागरिक थंड पाणी, शितपेयांचा आधार घेत आहेत. उन्हामुळे जिवाची तगमग होत आहे. अशा परिस्थितीत शहरापासून १२ किलोमिटर अंतरावर असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्यप्राण्यांची अवस्था कशी आहे याबाबत 'लोकमत' ने रविवारी प्रत्यक्ष पाहणी केली.दक्षिण देव्हारी, उत्तर देव्हारी, गोंधणखेड बिटमध्ये पाहणी करण्यात आली. वन्यजिव विभागाने वन्यप्राण्यांसाठी जागोजागी पाणवठे उभारल्याचे पाहणीत आढळून आले. तिसऱ्या दिवशी पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यात येते. तीन टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरु आहे. वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची गरज पडत नाही. जंगलातच त्यांच्यासाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे. उन्हाच्या झळांमुळे सर्वत्र पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. अनेक गावांमधील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या पृष्ठभूमीवर वन्यप्राण्यांची अवस्था जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ज्ञानगंगा अभयारण्याचा २० हजार हेक्टरवर विस्तार आहे. विविध प्रजातीच्या प्राणी व पक्ष्यांचा येथे अधिवास आहे. प्रामुख्याने अस्वल, बिबट, लांडगा, कोल्हा, तडस, रानडुक्कर, मोर, निलगाय, हरिण, माकड, रानमांजर हे प्राणी आढळतात. प्राण्यांच्या बारीक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी १८ ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत. अभयारण्यात रस्ते तयार केले आहेत. त्यामुळे दळणवळण सहज झाले आहे. एका ठिकाणावरुन दुसºया ठिकाणी वेगात मदत पोहचवता येते. जंगलात आग लागल्यास तत्काळ घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. रस्त्यांमुळे पर्यटकांना जंगल सफारीचा आनंद घेता येत आहे. ज्ञानगंगा अभयारण्याचे सौंदर्य व विविधता सर्वदूर पोहोचण्यास मदत झाली आहे. दिवसेंदिवस ज्ञानगंगा अभयारण्यास भेटी देणाºया पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.
सहा सोलर पंप बसवले
ज्ञानगंगा अभयारण्यात ४ राऊंड असून ९ बीट आहेत. प्रत्येक बीटमध्ये चार ते पाच यानुसार एकुण ५४ पाणवठे उभारले आहेत. यापैकी २० पाणवठे इको फ्रेन्डली आहेत. वन्यप्राण्यांना यामधील पाणी पिणे सहज शक्य होते. जंगलाच्या आतील भागात व रस्त्याला लागूनही पाणवठे उभारले आहेत. अभयारण्यात सहा सोलर पंप बसवले आहे. त्याद्वारे पाणवठ्यांमध्ये पाणी पोहोचवले जाते. सोलर पंपचे पाणी कायम राहल्यास भविष्यात टँकरची गरज भासणार नाही.
खाण्याच्या आशेने माकड रस्त्यावर
ज्ञानगंगा अभयारण्यातून खामगावकडे जाणाºया रस्त्यावर माकड बसलेले दिसतात. प्रवासी वाहन थांबले की त्याच्याजवळ जातात. प्रवासी त्यांना खायला देतात. खायला मिळते या आशेमुळे माकड दररोज रस्त्यावर येऊन बसतात. नागरिकांनी माकडांना खायला काहीच देऊ नये. तसे आढळून आल्यास २५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, असे आवाहन वन्यजिव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे यांनी केले आहे.