दहाव्या दिवशी नळाला पाणी!
By admin | Published: March 4, 2017 02:12 AM2017-03-04T02:12:16+5:302017-03-04T02:12:16+5:30
डोणगावात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.
डोणगाव(जि. बुलडाणा),दि. ३- उन्हाळ्याची तीव्रता सुरु झाली असताना डोणगावात पाण्याची पातळी खाली गेल्याने डोणगावात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. गावातील नळाला दहाव्या दिवशी पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. डोणगाव येथे जवळपास १00 सार्वजनिक हातपंप असून, सरकारी नळयोजना आहे. बहुतांश हातपंप नादुरुस्त, तर काही हातपंप पाण्याअभावी बंद आहेत. अशातच पाणीपातळी खाली गेल्याने व सरकारी विहिरीचे पाणी कमी झाल्याने डोणगावातील काही भागात दहाव्या दिवशी नळाला पाणी येत असल्याने येथील वार्ड क्र. ४ मधील महिलांनी ग्रामपंचायतमध्ये येऊन ग्रामसेवक व सरपंच यांना पाणी समस्येबाबत अवगत केले. परंतु पाण्याची पातळी खाली गेल्याने डोणगावात पाणी समस्या उग्ररुप धारण करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
डोणगाव येथील पाणी समस्या दूर करण्यासाठी आम्ही लवकरच विहीर अधिग्रहण प्रस्ताव व टँकर प्रस्ताव शासनाकडे सादर करुन पाणी समस्या दूर करु.
-पंजाबराव मोरे,
ग्रामविकास अधिकारी, डोणगाव.