एक वर्षासाठी पाण्याची चिंता मिटली, पण बिनधास्त होऊ नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:41 AM2021-09-08T04:41:54+5:302021-09-08T04:41:54+5:30
बुलडाणा : शहरासह परिसरातील गावांची तहान भागविणाऱ्या येळगाव धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. या दमदार पावसामुळे येळगाव धरणात ९० ...
बुलडाणा : शहरासह परिसरातील गावांची तहान भागविणाऱ्या येळगाव धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. या दमदार पावसामुळे येळगाव धरणात ९० टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे बुलडाणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. एक वर्षासाठी पाण्याची चिंता मिटली असली तरी, पाणी सांडण्यासाठी आता बिनधास्त न होता पाणी जपून वापरणेच महत्त्वाचे आहे. बुलडाणा शहराला येळगाव धरणातून पाणीपुरवठा केला जातो. येळगाव धरण आतापर्यंत ४० टक्केच भरले होते. त्यामुळे अर्ध्यापेक्षा अधिक पावसाळा होऊनही येळगाव धरण भरले नसल्याने नागरिकांमध्ये भविष्यातील पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु ६ सप्टेंबर रोजी रात्री व ७ सप्टेंबरला दिवसभर झालेल्या पावसामुळे येळगाव धरणात ९० टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे आता बुलडाणेकरांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे दिसून येत आहे.
रात्रीतून १०० टक्के भरण्याची शक्यता
हवामान विभागाने ७ व ८ सप्टेंबर असे दोन दिवस सार्वत्रिक पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. दरम्यान, ७ सप्टेंबरच्या पावसानेच येळगाव धरणात ९० टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे आणखी रात्रीतून हे धरण १०० टक्के भरण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
धरणात पैनगंगा नदीच्या पाण्याची आवकही सुरूच
येळगाव धरण जलाशयाची उच्चतम पातळी ६०५ मीटर इतकी आहे. बुलडाणा शहर व परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे येळगाव धरणाची पातळी ६०४.५० मीटरपेक्षा अधिक झालेली आहे. या धरणामध्ये पैनगंगा नदीच्या पाण्याची आवक सतत सुरू आहे.
सतर्कतेचा इशारा
येळगाव धरणाचा जलसाठा वाढला असून, हे धरण लवकरच भरून ओव्हर फ्लो होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येळगाव धरणाचे हे पाणी समोर जाते. त्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या लोकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी तहसीलदारांना पत्र दिले आहे.
बुलडाणा शहराला दिवसाला लागणारे पाणी : ११ एमएलडी
येळगाव धरण जलाशयाची उच्चतम पातळी : १२.४० दलघमी
सध्याचा जलसाठा : ११ दशलक्ष घनमीटर