वानखेड येथे भीषण पाणीटंचाई
By Admin | Published: May 19, 2017 12:32 AM2017-05-19T00:32:44+5:302017-05-19T00:32:44+5:30
जलपातळी खालावल्याने पाणीपुरवठा लांबणीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
वानखेड : यावर्षी मार्च, एप्रिल महिन्यापासूनच कडक उन्ह तापत असल्यामुळे त्याचा परिणाम गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतावर होवून पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे मे महिन्यातील कडक उष्णतामानात वानखेड येथे भीषण पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
पिण्याच्या पाण्याच्या भीषण समस्येमुळे गावात आठवड्यातून एक वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिल्यास ह्याहीपेक्षा पाण्याची समस्या बिकट होवू शकते. यावर उपाय म्हणून गावाजवळील शेतामधून विहिर अधिग्रहीत करून त्याव्दारे गावाला पाणी पुरवठा करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे. ह्याबाबत सविस्तर असे की, संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वानखेड गावाची लोकसंख्या आठ हजाराच्या जवळपास आहे. येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून तीन बोअरवेल व एका मोठ्या विहिरीव्दारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून कडक उन्ह तापत असल्यामुळे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोताची पाण्याची पातळी खोलवर तळाशी गेल्यामुळे पाणी पुरवठा आठ दिवसातुन एक वेळा अशी परिस्थिती निर्माण झाली.
पाणीटंचाई ची समस्या निर्माण झाल्यामुळे १७ मे रोजी वार्ड क्र.४ व ५ मधील महिला नागरीकांनी ग्रामपंचायतमध्ये येवून पाणी समस्येबाबत विचारणा करून पाणी समस्या त्वरीत सोडवा अशी मागणी केली.
तर दोन-तीन दिवसात गावाजवळ असलेल्या एका बोअरवेलमध्ये इलेक्ट्रीक मोटार बसविली जावून त्यावरून पाणी पुरवठा करण्यात येईल तसेच इतरही पर्याय निवडून सर्वांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सरपंच अंजना सोळंके, ग्रामसेवक धनावडे ग्रामसेवक यांनी सांगितले.