सरपंच, पंचायत समिती सभापती निवडीचा मार्ग झाला मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 12:02 PM2021-02-27T12:02:48+5:302021-02-27T12:03:00+5:30

Buldhana News दोन पंचायत समिती सभापती व चार ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडणुकीला देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठविण्यात आली आहे.

The way for election of Sarpanch, Panchayat Samiti Chairman has been cleared | सरपंच, पंचायत समिती सभापती निवडीचा मार्ग झाला मोकळा

सरपंच, पंचायत समिती सभापती निवडीचा मार्ग झाला मोकळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोनाचे वाढलेले संक्रमण तथा जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशानंतर, दोन पंचायत समिती सभापती व चार ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडणुकीला देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठविण्यात आली आहे. दरम्यान, या निवडणुका आता ३ मार्च रोजी घेण्यात येणार आहेत. या संदर्भात निवडणूक विभागाने आदेश निर्गमित केले आहे. आधीच्या निर्णयामुळे राजकारणातही लॉकडाऊनचा शिरकाव होतो की काय, अशी भीती व्यक्त होत असतानाच या निवडणुका ऑफलाइन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्या दहा ते १२ दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचे तीन हजारांच्या आसपास कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळून आले होते. मिशन मोडवर प्रशासनाने जिल्ह्यात दहा दिवसांत दब्बल २१ हजार ६००पेक्षा अधिक संदिग्धांच्या कोरोना चाचण्या केल्या होत्या. वाढते संक्रमण पाहता, जळगाव जामोद व संग्रामपूर पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक, बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट, नांदुरा तालुक्यातील नारखेड, जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव गड आणि चिखली तालुक्यातील खैरव येथील सरंपचपदाची निवडणूक तात्पुरत्या स्वरूपात १ मार्च, २०२१ पर्यंत स्थगित केली होती. दरम्यान, २६ फेब्रुवारी रोजी पुन्हा या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाने या निवडणुका तीन मार्च रोजी घेण्याचे निर्देशित केले आहे. 
त्यामुळे अनेक राजकीय इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जळगाव जामोद व संग्रमापूर पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक २६ फेब्रुवारी रोजी होणार होती. येथील दोन्ही सभापतींनी राजीनामे दिल्यामुळे तेथील सभापतीपद रिक्त झाले होते. तात्पुरत्या स्वरूपात पंचायत समितीचा कारभार तेथील उपसभापती पाहत होते. या व्यतिरिक्त तांत्रिक अडचणीमुळे बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट आणि नांदुरा तालुक्यातील नारखेड येथील ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक ही २६ फेब्रुवारीलाच होती. देऊळघाटमध्ये तर सुधारित अनुसूचित जाती संवर्गाचा एकच सदस्य असल्याने येथील निवडणूक केवळ एक अैापचारिकताच राहली होती. 
देऊळघाट येथे १७ सदस्यांसाठी ग्रामविकास पॅनल व सामाजिक एकता पॅनलमध्ये निवडणूक झाली होती. यासोबतच नारखेड, वडगाव गड आणि खैरव येथील रिक्त राहलेल्या सरपंचपदाचीही निवडणूक तीन मार्च रोजीच घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली.
उंद्री व निमगाव पोटनिवडणुकीकडे लागले लक्ष
आता उंद्री व निमगाव जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीकडेही राजकारण्यांचे लक्ष लागले असून, १० मार्च रोजी या दोन्ही गटांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे येथील पोटनिवडणूकही प्रसंगी मार्चअखेर लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा मुकाबला होण्याची शक्यता आहे. उंद्री जि.प. गटाच्या सदस्य श्वेता महाले या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याने, त्याने जि.प. सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे येथील सदस्यत्व रिक्त आहे. निमगाव गटातून निवडून आलेले मधुकर वडोदे यांचे अकाली निधन झाल्यामुळे येथील सदस्यत्व रिक्त होते.

Web Title: The way for election of Sarpanch, Panchayat Samiti Chairman has been cleared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.