पाणीदार झालेल्या गावांची समृद्धीकडे वाटचाल - ब्रम्हदेव गिऱ्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 11:58 AM2020-03-07T11:58:42+5:302020-03-07T11:58:56+5:30
पानी फाऊंडेशनचे मोताळा तालुका समन्वयक ब्रम्हदेव गिऱ्हे यांच्याशी संवाद...
- योगेश फरपट
खामगाव : वॉटरकप स्पर्धेप्रमाणेच गावकºयांनी समृद्ध गाव स्पर्धेत उत्स्फुर्त सहभागी होत गाव समृद्ध करण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे मत पानी फाऊंडेशनचे मोताळा तालुका समन्वयक ब्रम्हदेव गिऱ्हे यांनी व्यक्त केले.
पानी फाउंडेशनचा कोणता उपक्रम सुरु आहे?
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ही यावेळेस पासून बंद झाली आहे. यावेळेस सत्यमेव जयते ‘समृद्ध ग्राम स्पर्धा’ ही महाराष्ट्रातील ४० तालुक्यात सुरु केली आहे. यामध्ये बुलडाणा जिल्हयातील मोताळा हा एकमेव तालुका आहे.
मोताळा तालुक्यातील कोणत्या गावांचा समावेश आहे?
मागील दोन वर्षाच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये किमान ३० गुणांची कामे करणारी २० गावे या स्पर्धेसाठी पात्र आहेत. यामध्ये सिंदखेड, लपाली, पोफळी, पोखरी, जयपूर, जनुना, चिंचखेडनाथ, शेलापूर खुर्द, उबाळखेड, खामखेड, दाभा, कोºहाळाबाजार, महाळूंगी जहॉगिर, चिंचपूर, भोरटेक, तिघ्रा या गावांचा समावेश आहे.
सद्याची काय स्थिती आहे?
माहे जानेवारी ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत उपरोक्त पात्र गावातील शाळकरी विद्यार्थ्यांसोबत निसर्गाची धमाल शाळा हा सहा दिवसीय उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आपुलकीचे व प्रेमाचे नाते निर्माण व्हावे यादृष्टीने माती, पाणी, वृक्षलागवड, हवामान बदल, आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात येवून जाणिव जागृती करण्यात आली.
पुढील कामाची दिशा काय असेल?
मार्चच्या दुसºया आठवड्यापासून स्पर्धेसाठी पात्र गावांच्या गावकºयांचे पानी फाउंडेशनमार्फत चार दिवसीय निवासी प्रशिक्षण विविध बँचेचमध्ये घेणार आहोत. तद्नंतर गावात प्रत्यक्ष जल व मृदसंधारणाच्या कामाला सुरवात केली जाईल. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुमन चंद्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. षण्मुगराजन यांचे मार्गदर्शनात जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन व स्थानिक गावचे सरपंच व ग्रामस्थ स्पर्धेसाठी तयार आहेत. समृद्ध गाव स्पर्धेसाठी जिल्हयातून आपल्याच गावाची निवड झाली आहे, याची जाणिव ठेवत पानी फाउंडेशन व प्रशासनाच्या माध्यमातून आपले गाव अधिक समृद्ध करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा व मिळालेल्या संधीचे सोने करावे. आगामी काळात होणाºया सर्व प्रशिक्षणात पुर्ण क्षमतेने गावांनी सहभागी होण्याची गरज आहे.
नेमकी ही स्पर्धा कशी असेल?
ही स्पर्धा १८ महिन्यांची असून यामध्ये प्रामुख्याने मृदा आणि जलसंधारण, जलव्यवस्थापन आणि पाण्याचा ताळेबंद, जंगल आणि वृक्षांची लागवड व वाढ करणे, पौष्टिक गवताचे संरक्षित कुरणक्षेत्र तयार करणे, मातीची आरोग्य आणि पोत सुधारणे, प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधार तयार करणे या कामांचा या स्पर्धेत समावेश असेल.