हल्ले केले तरी आम्ही थांबणार नाही, बुलढाणा हे बिहार नाही; ठाकरे गटाचा इशारा

By निलेश जोशी | Published: September 3, 2022 02:42 PM2022-09-03T14:42:17+5:302022-09-03T14:48:11+5:30

बुलढाण्यात ठाकरे गटाच्या मेळाव्यात शिंदे गटाच्या समर्थकांचा हल्ला, अनेकांना धक्काबुक्री, खुर्च्या तोडल्या: बाजार समिती परिसरात तणावसदृश्य स्थिती

We will not stop even if attacked, Buldhana is not Bihar; Warning of Thackeray group to Shinde group | हल्ले केले तरी आम्ही थांबणार नाही, बुलढाणा हे बिहार नाही; ठाकरे गटाचा इशारा

हल्ले केले तरी आम्ही थांबणार नाही, बुलढाणा हे बिहार नाही; ठाकरे गटाचा इशारा

googlenewsNext

बुलढाणा-  शिवसेनेच्या शिंदे गट व उद्धव ठाकरे गटामध्ये बुलढाण्यात मुद्द्यावरून लढाई आता गुद्द्यावर आली आहे. शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास उद्धव ठाकरे गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या समर्थकांनी थेट आतमध्ये घुसत हल्ला करून तोडफोड केली. दरम्यान उद्धव ठाकरे गटातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या प्रकरणात बुलडाणा शहर पोलिसांनीही  बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी केला आहे.

शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडल्याने बुलढाणा शहरात अफवांना पेव फुटले होते. घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी प्रत्यक्ष बुलढाणा बाजार समितीमधील सभागृहात भेट देऊन पाहणी केली. सोबतच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत आणि वरिष्ठ पदाधिकारी दत्ता पाटील यांच्याशी चर्चा केली. बुलढाणा बाजार समिती परिसरातील सध्या तणावसदृश्य असून शीघ्र कृती दलासह पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी सध्या तैनात करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम बाजार समितीच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यता आला होता. या कार्यक्रमास शिवसनेचे उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम सुरू होत असतानाच शिवसेनच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीमध्ये प्रवेश करत थेट सभागृह गाठून तेथे उपस्थित उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनासह कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. सोबतच  सभागृहातील खुर्च्यांचीही तोडफोड केली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.

पोलिसांची बघ्याची भूमिका
या प्रकरणात हल्ला करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अभय दिलेले आहे, असा आरोप जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी केला. बुलढाणा शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्यावरच त्यांनी थेट आरोप केला आहे. शीघ्रकृती दलाच्या जवानांचीही भूमिका ही संशयास्पद होती. बुलडाण्याचे ठाणेदारही कोणत्या आमदाराच्या शिफारशीवर बुलढाण्यात आले याचीही आम्हाला कल्पना असल्याचे प्रा. खेडेकर म्हणाले. दरम्यान हल्ला करणाऱ्यांजवळ हत्यारही होती, असे ते म्हणाले. सत्तेत असणाऱ्यांच पोलिस सपोर्ट करत असल्याचे ते म्हणाले. एस. पी. अरविंद चावरिया यांनाही या प्रकरणात भेटणार आहोत.

आमदार पुत्रावर आरोप
बुलढाण्याचे आ. संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड हे या हल्ल्यात सहभागी होती. त्यांना आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्याचे प्रा. नरेंद्र खेडेकर म्हणाले. बाजार समितीच्या आतमधील सभागृहापर्यंत नारेबाजी करत हल्ला करणारे आले. त्यामुळे पोलिसंची भूमिका यात संशयास्पद असल्याचे प्रा. खेडेकर म्हणाले.

आम्ही थांबणार नाही- बुधवत
अशा पद्धतीचे हल्ले केले तरी आम्ही थांबणार नाही. बुलढाणा हे बिहार नाही. शिवसेनचे काम सातत्यपूर्ण काम करत आहे. आम्ही कार्यरत राहू. पोलिसांनीही योग्य कार्यवाही न केल्यास संपूर्ण जि्ल्ह्यात याचा उद्रेक उमटेल, असे जिल्हा शिवसेना प्रमुख जालिंधर बुधवत म्हणाले. आम्ही पोलिस प्रशासनाची वाट पहाणार आहोत. हल्ले करणाऱ्यांची नावेही पोलिसांना देण्यात येणाऱ्या रिपोर्टममध्ये देण्यात येणार असल्याचे बुधवत म्हणाले.

Web Title: We will not stop even if attacked, Buldhana is not Bihar; Warning of Thackeray group to Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.