शेतक-यांना मिळणार हवामानाची माहिती!

By Admin | Published: June 19, 2017 04:27 AM2017-06-19T04:27:00+5:302017-06-19T04:27:00+5:30

एसएमएस सुविधा; बुलडाणा जिल्ह्यातील ५0 हजार शेतक-यांना लाभ.

Weather information will be provided to farmers. | शेतक-यांना मिळणार हवामानाची माहिती!

शेतक-यांना मिळणार हवामानाची माहिती!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : पावसाच्या लहरीपणामुळे बर्‍याच वेळा शेतकर्‍यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन शेतकर्‍यांना हे नुकसान टाळता येणार आहे. यात एसएमएसच्या सेवेमधून शेतकर्‍यांना हवामानाची माहिती दिली जाणार आहे. शिवाय पीकविषयक सल्ले, माती परीक्षण, सिंचन सुविधा, बाजारभाव, विविध योजनांची माहिती जिल्ह्यातील ५0 हजार शेतकर्‍यांना मिळत आहे.
शासनाच्या किसान एसएमएस सेवातून मोबाइलवर मोफत एसएमएस सेवेद्वारे शेतकर्‍यांना शेतीसल्ला दिला जातो. राज्यात २0१३ मध्ये ही सेवा चालू झाल्यानंतर डिसेंबर २0१३ अखेर ६ लाख ५0 हजार एवढी नोंदणी होती. जुलै २0१४ अखेर ८ लाख ५0 हजार एवढी झाली. २0१५ मध्ये राज्यात सुमारे १५ लाख ४१ हजार ३९८, तर मार्च २0१६ पर्यंंंत हा आकडा २0 लाख होता. आता २0१७ मध्ये लाभार्थी शेतकर्‍यांचा आकडा ४५ लाखांवर पोहचला आहे.
कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यसंवर्धन, हवामान विभाग व फलोत्पादन या विभागांमार्फत मोफत एसएमएसद्वारा शेतकर्‍यांना कृषी सल्ला मिळतो. आता केंद्राच्या किसान एसएमएसच्या सेवेमधून शेतकर्‍यांना पीकविषयक सल्ले, माती परीक्षण, सिंचन सुविधा, बाजारभाव, विविध योजनांची माहिती मिळत आहे, तर जुलै २0१७ पासून शेतकर्‍यांना एसएमएसद्वारे हवामानाची माहितीही प्राप्त होणार आहे. यामुळे खरीप व रब्बी पेरणी करताना मोठी मदत होणार आहे. (प्रतिनिधी)

जिल्ह्यात शेतक-यांना मिळणार लाभ
विविध योजनांचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांकडून मोबाइल नंबर नियमित घेतले जातात. त्यामुळे ३0 हजार ६५७ एवढय़ा शेतकर्‍यांना मोफत एसएमएस कृषी सल्ला दिला जात होता. जिल्ह्यात २0१६-१७ मध्ये १९ हजार ३४३ शेतकर्‍यांचे मोबाईल क्रमांक नव्याने जोडण्यात आले आहेत. त्यामुळे आता किसान एसएमएस सेवा लाभ घेणार्‍या जिल्ह्यातील ५0 हजार शेतकर्‍यांना हवामानाचा अंदाज समजणार आहे.

प्रत्येक १0 मिनिटांनी अंदाज
सध्या किसान एसएमएस सेवा सुरू आहे. त्यातील लाभार्थी शेतकर्‍यांना स्वयंचलित हवामान केंद्रात संकलित होणारा हवामानाचा अंदाज प्रत्येक १0 मिनिटांनी एसएमएसद्वारे उपलब्ध केला जाणार आहे. १२ किलोमीटरच्या परिसरातील शेतकर्‍यांना एका केंद्रातून हवामानाचा अचूक अंदाज प्राप्त होणार आहे. यासाठी राज्यात २ हजार ६५ स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येत आहेत.

Web Title: Weather information will be provided to farmers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.