लग्नसराईची धूम !
By Admin | Published: May 14, 2017 07:35 PM2017-05-14T19:35:16+5:302017-05-14T19:35:16+5:30
मोताळा : उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्याबरोबरच लग्नसराईचाही शेवटचा महिना असल्याने मोताळा तालुक्यासह परिसरात लग्नसराईची लगबग दिसून येत आहे.
मोताळा : उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्याबरोबरच लग्नसराईचाही शेवटचा महिना असल्याने मोताळा तालुक्यासह परिसरात लग्नसराईची लगबग दिसून येत आहे. लग्न सोहळ्याला जाण्यासाठी बसस्थानकामध्ये गर्दी होत आहे. त्यात उन्हाच्या चढत्या पाऱ्याने भर घातली असून, ४२ अंशावर पोहोचलेल्या तापमानामुळे उन्हात लग्न सोहळयासाठी वऱ्हाडी मंडळींची चांगलीच घालमेल होत आहे.
मे महिन्यात लग्नसोहळ्याच्या शेवटच्या तिथी आहेत. उन्हाळ्याचा शेवटचा महिना आहे. आठवडाभरापासून तापमान ३८ ते ४२ अंशावर कायम राहत आहे. अनेक लग्नाच्या तिथी एकाच दिवशी असल्याने वऱ्हाडी मंडळींसह नातेवाईक व मित्र मंडळींची चांगलीच दमछाक होत आहे. एकाच तिथीला अनेक लग्न असल्यामुळे कापड व्यवसाय, गिफ्ट सेंटर, ज्वेलरी शॉपवर गर्दी दिसून येत आहे. दुसरीकडे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, सामान्यजणांसह अबालवृद्ध घामाघूम होऊन चांगलेच त्रस्त झाले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी उसाचा रस, थंड शीतपेयाचा आधार नागरिक घेत आहेत. ऐन कडक उन्हात लग्नसराईची धूम असल्याने लग्न सोहळयासाठी मित्र, पाहुणे, नातलग, सहकारी, नातेवाईक यांना कडक उन्हात चांगलीच धावपळ करावी लागत आहे. लग्नसराईच्या तिथी दुपारच्या वेळी व एकाच तिथीला अनेक लग्न असल्याने उन्हात लग्न सोहळयासाठी उपस्थित राहण्यासाठी सर्वांचीच तारांबळ उडत आहे. एकाच तिथीला अनेक लग्न असल्याने कुटुंबातील सर्वच जणांना भावकी व मित्र मंडळींंच्या लग्नाला हजेरी लाववी लागत आहे. अनेक ठिकाणी फक्त भेट तर काही ठिकाणी आहेर पाठवून लग्न साधल्या जात आहे. कडक उन्हाचा मोठा अडथळा असला तरी जवळच्या लग्नासाठी हजेरी लावणे आवश्यक असते. त्यासाठी कोणी सावलीचा, कोणी ज्यूस तर कोणी रसवंतीचा आधार घेत आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागल्योन बाटलीबंद तथा आरोच्या पाण्याची मागणी वाढली आहे. सध्या परिसरात ४२ अंशावर पारा गेला आहे. मात्र पावसाळा जवळ आल्याने शेतकरी मशागतीत व्यस्त दिसून येत आहे. तर लग्नसराईमुळे बाजारपेठेतही मोठी उलाढाल होत असल्याचे चित्र आहे.