बुलडाणा जिल्ह्यात शनिवार व रविवारचा लॉकडाऊन रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 11:16 AM2021-03-13T11:16:27+5:302021-03-13T11:16:35+5:30
lockdown canceled in Buldana district दोन तासातच घूमजाव करत हा निर्णय मागे घेण्यात येत असल्याचे शुद्धीपत्रकच जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुकारण्यात आलेला शनिवार व रविवारचा लॉकडाऊन जिल्हा प्रशासनाने मागे घेतला आहे. शुक्रवारी दुपारी प्रारंभी दोन्ही दिवस लॉकडाऊन प्रशासनाने जाहीर केला होता, मात्र नंतर दोन तासातच घूमजाव करत हा निर्णय मागे घेण्यात येत असल्याचे शुद्धीपत्रकच जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले. दरम्यान सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने घालून देण्यात आलेल्या नियमानुसार सुरू ठेवता येणार आहेत.
जिल्हा प्रशासनाने १७ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मर्यादित स्वरुपात जिल्ह्यात लॉकडाऊन करून रात्रीची संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर शनिवार व रविवारी दिवसभर लॉकडाऊन व सायंकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली होती. त्या अनुषंगाने या शनिवार व रविवारीही प्रारंभी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनबाबात आदेश जारी केले होते. मात्र अवघ्या दोन तासाच हा आदेश मागे घेऊन केवळ रात्रीची संचारबंदी लागू केली असल्याचे प्रभारी अपर जिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. सोबतच रात्रीची संचारबंदीची अधिक कडक पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी पालिका व पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असल्याचेही ते म्हणाले.
आठवडी बाजारावरील स्थगिती कायम
कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता जिल्ह्यातील आठवडी बाजारांना जिल्हा प्रशासनाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आठवडी बाजार सध्या जिल्ह्यात भरत नाही. शनिवार व रविवारचा लॉकडाऊन रद्द करण्यात आला असला तरी या दिवशी भरणारे आठवडी बाजार मात्र रद्द करण्यात आले असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले.