मलकापूर पांगरा येथील आठवडी बाजाराचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:34 AM2021-03-05T04:34:34+5:302021-03-05T04:34:34+5:30
बुलडाणा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या मलकापूर पांगरा येथील आठवडी बाजाराचा ४ मार्च रोजी विस्ताराधिकारी ग्राम विकास अधिकारी, सरपंच यांच्या उपस्थितीत ...
बुलडाणा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या मलकापूर पांगरा येथील आठवडी बाजाराचा ४ मार्च रोजी विस्ताराधिकारी ग्राम विकास अधिकारी, सरपंच यांच्या उपस्थितीत लिलाव करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांच्या आदेशान्वये १ एप्रिल २०२१ ते २०२२ पर्यंत एका वर्षाच्या लिलावासाठी उमेदवारांकडून बोली बोलण्यात आली होती. यात गावातील सोनकांबळे नामक व्यक्तीने सात लक्ष रुपयांची बोली बोलून लिलाव घेतला; मात्र गावातील उपस्थित व्यापारी वर्गाने विस्तार अधिकाऱ्यांना घेराव घालत शासनाने कोरोना संसर्गाची या पार्श्वभूमीवर बाजार बंद असताना फिरते भाजीपाला विक्रेत्यांकडून मागील वर्षाच्या लिलावधारकाने वसुली केली, याचा जाब विचारण्यात आला. शासनाने आणि अधिकृत केलेल्या शासन फीनुसारच वसुली करण्यात यावी, असा मुद्दा उचलून धरत विस्तार अधिकारी व संबंधित ठेकेदाराला घेराव घातला होता. बाजार बंद असताना लिलाव कसा करता, असे अनेक मुद्दे उपस्थित केले.
आठवडी बाजाराच्या पडक्या भिंती जीवघेण्या
मलकापूर पांगरा आठवडी बाजाराचा महसूल लाखोंच्या घरात आहे. गोरगरीब शेतकऱ्यांकडून अव्वाच्या सव्वा वसुली केल्या जाते; मात्र येथील मार्केट यार्डच्या पडक्या भिंती जीवघेण्या असून, संबंधितांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे मत किरकोळ व्यापारी वाजीत खा. वाहेद खा. पठाण यांनी व्यक्त केले.