विरोधकांच्या लिस्टवर कर्जमाफीनंतर भारनियमन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:50 AM2017-09-18T00:50:07+5:302017-09-18T00:50:25+5:30
जिल्ह्यात विरोधी पक्ष आतापर्यंत कर्जमाफीसाठी लढा देत होते. कर्जमाफीला मुदतवाढ मिळाल्यानंतर आता काँग्रेसच्या लिस्टवर भारनियमनाचा प्रश्न समोर आला आहे. जिल्ह्यात विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकापाठोपाठ एक मुद्दे उचलत असून, आता जिल्ह्यातील भारनियमनाविरोधात काँग्रेसने रणशिंग फुंकले असल्याने विरोधी पक्षांची जागरूकता वाढल्याचे दिसून येत आहे.
ब्रह्मनंद जाधव।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात विरोधी पक्ष आतापर्यंत कर्जमाफीसाठी लढा देत होते. कर्जमाफीला मुदतवाढ मिळाल्यानंतर आता काँग्रेसच्या लिस्टवर भारनियमनाचा प्रश्न समोर आला आहे. जिल्ह्यात विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकापाठोपाठ एक मुद्दे उचलत असून, आता जिल्ह्यातील भारनियमनाविरोधात काँग्रेसने रणशिंग फुंकले असल्याने विरोधी पक्षांची जागरूकता वाढल्याचे दिसून येत आहे.
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत शेतकर्यांना कर्जमाफी दिली; मात्र कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी विविध अडचणींची शर्यत ठेवून अंतिम मुदतसुद्धा १५ सप्टेंबर देण्यात आली होती. कर्जमाफीचा लाभ प्रत्येक शेतकर्यांला मिळावा व त्यातील अटी शिथिल कारण्यात याव्या यासह कर्जमाफीचे ऑनलाइन अर्जाची मुद त वाढविण्याच्या मागणीसाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व इतर विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले. कर्जमाफीच्या मुद्दावरून जिल्ह्यात विरोधकांची आक्रमकता वाढतच गेली. परिणामी १४ सप्टेंबरला कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जासाठी २२ स प्टेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली. कर्जमाफीनंतर आता जिल्ह्यातील विरोधी पक्षांनी भारनियमनाचा मुद्दा उचलला आहे.
जिल्ह्यात महावितरणने भारनियमन सुरू केले असून, शहरासह ग्रामीण भागात तासन्तास विद्युत पुरवठा खंडित केल्या जात आहे. त्यामुळे या भारनियमनाच्या विरोधात जिल्ह्यात काँग्रेसने रणशिंग फुंकले आहे. त्यासाठी सरकारच्या निषेधार्थ जिल्ह्यात काँग्रेसच्यावतीने कंदिल मोर्चाचा मार्ग पत्करण्यात आला आहे.
विरोधी बाकावर बसून सामाजिक घटकांना न्याय देण्यासाठी आवाज उठविण्याचे कार्य काही काळ जिल्ह्यात थंडावले होते; मात्र आता कर्जमाफीनंतर भारनियमन व पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोध अशा प्रश्नांवर जिल्ह्यातील विरोधी पक्ष वारंवार आंदोलन व मोर्चे काढून आपली विरोधी पक्षाचे अस्तित्व टिकून ठेवत आहे.
सरकारच्या विरोधात प्रश्नांमागून प्रश्न उचलले जात असल्याने जिल्ह्यातील विरोधी पक्षांना आता आपल्या क र्तव्याची जाणीव झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात विरोधकांची आंदोलनांची मालिका सुरूच!
विरोधी बाकावर बसून सर्वसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात आंदोलनामागून आंदोलन करत आहे. नाफेडमार्फत होणार्या तूर खरेदीतील घोटाळा व नाफेडची तूर खरेदीसाठी मुदत वाढवून देण्यासाठी विरोधक रस्त्यावर उतरले. त्यानंतर कर्जमाफी मिळण्यासाठी शेतकर्यांसह पुन्हा विरोधी पक्षांकडून आंदोलन करण्यात आले. शेतमालाला कमी भाव मिळणे, कर्जमाफी आणि आता भारनियमन व पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोध अशा प्रश्नांवर जिल्ह्यातील विरोधी पक्षांची जिल्ह्यात आंदोलनाची मालिका सुरूच आहे.
विरोधी पक्षांना ग्रामपंचायत निवडणुकीतही रस
जिल्ह्यात ७ ऑक्टोबर रोजी २७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे सध्या ग्रामीण भागतील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. ग्राम पंचायतच्या निवडणुकीत सरपंच जनतेतून निवडल्या जाणार असल्याने युवा वर्गांचा पुढाकार वाढला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील उत्साही युवा उमेदवारांना हाताशी धरले आहे. विरोधी पक्षाकडून ग्राम पंचायत निवडणुकीतही रस दाखविला जात असून, आंदोलनाचे मुद्दे ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागा तही गाजत आहेत.