बुलडाणा : बालिकादिनी जन्म घेणा-या चार ‘सावित्रीं’चे रुग्णालय प्रशासनाने केले स्वागत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 08:17 PM2018-01-04T20:17:07+5:302018-01-04T20:25:33+5:30
बुलडाण्यात ४0 वर्षांपासून अविरत सेवा देणा-या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चार सावित्रींच्या जन्माचे स्वागत त्यांच्या कुटुंबियासह हॉस्पिटल प्रशासने करून ख-या अर्थाने बालिका दिन साजरा केला.
हर्षनंदन वाघ
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : मुलींच्या जन्मदर वाढावा म्हणून शासनातर्फे बेटी बचाव, बेटी पढाव अभियान राबविण्यात येत आहे. तरीही अनेक ठिकाणी मुलींचा जन्म झाल्यावर नाके मुरडणारी अनेक कुटुंबियांची संख्या आहे. बुलडाण्यात ४0 वर्षांपासून अविरत सेवा देणा-या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चार सावित्रींच्या जन्माचे स्वागत त्यांच्या कुटुंबियासह हॉस्पिटल प्रशासने करून ख-या अर्थाने बालिका दिन साजरा केला.
अवैधरित्या सोनोग्राफी करून मुलींना गर्भातच मारल्यामुळे मुलींचा जन्मदर कमी होत असल्याचे मागिल काही वर्षात दिसून आले. पीसीपीएनडीटी कायद्याचा फास, भरारी पथकांची नजर, सोनोग्राफी सेंटरवर होणा-या कारवाया, मुलींचा जन्मदर वाढवण्याबाबत जाहिरातीबरोबरच विविध माध्यमातून होणारी जनजागृतीङ्घअशाप्रकारे स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गेल्या तीन चार वर्षांत विविध पातळ्यांवर व्यापक प्रयत्न होत असले तरी राज्यातील मुलींचा जन्मदर पुन्हा ९०० पेक्षा खाली घसरल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. २०१४ मध्ये प्रत्येक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर ९१४ इतका होता. २०१५ मध्ये तो ९०७ आणि २०१६ अखेरीपर्यंत तो ८९९ इतका खाली आला आहे.
अशा परिस्थितीत समाजाची मानसिकता बदलत असल्याचे दिसून येत असून अनेक कुटुंबिय मुलींच्या जन्माचे स्वागत करीत आहेत. अशा प्रकारचे स्वागत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी बुलडाण्यातील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. बुलडाणा तालुक्यातील शिरपूर येथील सरला मदन शेळके यांनी दुपारी ११.५ मिनीटांनी मुलीला जन्म दिला. नागपूर येथील सुषमा सुशिल पवार यांनी दुपारी १.२ मिनीटांनी मुली जन्म दिला. बुलडाणा येथील पौर्णिमा गणेशकुमार कदम यांनी २.५१ मिनीटांनी मुलीला जन्म दिला. तर ब-हाणपूर येथील वंदना जयप्रकाश महाजन यांनी रात्री ९.१५ मिनीटांनी मुलीला जन्म दिला. या मुलींच्या जन्माचे त्यांचे कुटुंबिय व हॉस्पिटल प्रशासने स्वागत करून आनंद व्यक्त केला.
बेबी किट देवून केला सन्मान
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी मुलींना जन्म झाल्यामुळे चारही कुटुंबियांच्या सदस्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी मुलींच्या जन्माचे स्वागत करून डॉ.अर्चना वानेरे यांनी बेबी किट देवून चारही नवजात मुलींचे व त्यांच्या मातेचा सन्मान केला. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी मुलींचा जन्म झाल्यामुळे आपल्या घरी खºया अर्थाने सावित्री आली असून स्वावित्रीबाई फुले यांच्या प्रमाणे आमच्या घरातील सावित्री कुटुंबियांचे नाव उंचावेल, अशा भावना नवजात मुलींच्या कुटुंबातील सदस्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी नव्या पिढीने पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे. गेल्या ४0 वर्षांपासून अविरत सेवा देणा-या धन्वंतरी हॉस्पीटल प्रशासनाच्यावतीने बालिकादिनी हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला.
- डॉ. अर्चना वानेरे
धन्वंतरी हॉस्पीटल, बुलडाणा