पावसाळ्यात भागवावी लागते विहीर अधिग्रहणावर तहान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 11:21 AM2021-06-22T11:21:21+5:302021-06-22T11:21:44+5:30
Buldhana District News : पावसाळ्यातही टँकर आणि विहीर अधिग्रहणावर तहान भागवावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील पाणी टंचाईची झळ अद्यापही कमी झालेली नाही. गेल्या २० दिवसात १०० गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यातही टँकर आणि विहीर अधिग्रहणावर तहान भागवावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यात यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावली. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ८३.५ मि.मी पाऊस झाला आहे. मात्र हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा न झाल्याने अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक भागात पावसाळ्यातही पाणीटंचाई कायम आहे. जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ पावसाळ्याच्या दिवसात प्रशासनाला विहीर अधिग्रहण करण्याची वेळ आली. जून महिना लागल्यापासून जवळपास १०० गावांमध्ये विहीर अधिग्रहण मंजूर करण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठाही करण्यात येत आहे. शिवाय, एप्रिल आणि मे महिन्यात पाणीटंचाई निवारणार्थ केलेल्या उपाययोजनाही अद्याप सुरूच आहेत. त्यावरून पाणीटंचाईची दाहकता अद्यापही कमी झाली नसल्याचे चित्र आहे.
उन्हाळा सोडून पावसाळ्यात उपाययोजना
उन्हाळ्यात पाणीटंचाई उद्भवू नये, म्हणून शासकीय यंत्रणांकडून वेळीच उपाययोजना केल्या जातात. त्यासाठी संभाव्य पाणीटंचाईची आढावा बैठक घेतली जाते. परंतु जिल्ह्यात उन्हाळा सोडून पावसाळ्यात पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना कराव्या लागल्याची स्थिती आहे.
तहान भागल्यानंतर विहीर खोदण्याचा प्रकार
सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डासारख्या काही गावांत विहीर अधिग्रहणाची आवश्यकता नसतानाही विहीर अधिग्रहण मंजूर करण्यात आले आहे. तहान भागल्यानंतर विहीर खोदण्याचा हा प्रकार दिसून येतो. साखरखेर्डा येथील महालक्ष्मी तलाव सध्या ८० टक्के भरलेला आहे. कोराडी प्रकल्पावरून येथे लोखंडी पाईपलाईनही मंजूर आहे. मात्र याठिकाणी १० जून रोजी विहीर अधिग्रहण मंजूर झाले आहे.
साखरखेर्डा येथील विहीर अधिग्रहणाचा कोणताही प्रस्ताव सादर केला नाही.
- रामेश्वर आढाव, ग्रामविकास अधिकारी, साखरखेर्डा.
पिंपळगाव सोनारा येथील विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यात पाठविला होता. मार्चमध्ये प्रस्ताव मंजूर झाला. आता दुसरा प्रस्ताव सादर केला नाही.
- तोताराम ठोंसरे,
सरपंच, पिंपळगाव सोनारा.