विहीर खोदली; अनुदान मात्र नाही!
By admin | Published: August 28, 2016 11:19 PM2016-08-28T23:19:56+5:302016-08-28T23:19:56+5:30
मेहकर तालुक्यातील प्रकार; शेतकरी अद्याप सिंचन विहिरीसाठी देय अनुदानापासून वंचित.
जानेफळ(जि. बुलडाणा),दि. २८: विविध कामांच्या बाबतीत नेहमीच चर्चेत राहणारी रोजगार हमी योजना सध्या मेहकर तालुक्यातील सिंचन विहिरींमुळे पुन्हा चर्चेत आली असून या योजनेतून विहिर मंजूर झालेल्या शेतकर्यांनी ३0 फूट खोल विहिर खोदून पूर्ण केलेली असतांना त्यांना अद्यापपर्यंंंत अनुदान देण्यात आलेले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. तर दुसरीकडे काही शेतकर्यांनी विहिरीच्या कामाला सुरुवारत केलेली नसताना सुद्धा त्यांना मात्र दोन टप्प्याच्या कामाचे धनादेश देऊन पैसे अदा करण्यात आल्याची तक्रार शेषराव श्रीराम धोटे यांनी केली आहे.
मेहकर तालुक्यातील उटी येथील शेषराव श्रीराम धोटे यांना यावर्षी रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिर मंजूर झालेली आहे. त्यांना या विहिरीच्या कामाचे वर्क ऑर्डर २२ एप्रिल २0१६ रोजी मिळाल्यानंतर त्यांनी गट नं.४७ मधील आपल्या शेतात विहिरीच्या कामाला सुरुवात करुन ३0 फुट खोल विहिर खोदल्याने त्या विहिरीला चांगल्या प्रमाणात पाणी सुद्धा लागलेले आहे. परंतु त्यांना अद्यापपर्यंंंत एक रुपया अनुदान सुद्धा मिळाले नसल्याने विहिरीचे काम अर्धवट अवस्थेत पडून आहे. त्यांना उसणवारीने तसेच पतसंस्थेचे कर्ज काढून विहरीसाठी पैसा लावलेला असताना त्यांची अडवणूक करुन पैसा देण्यास टाळाटाळ केल्या जात आहे. तर दुसरीकडे मात्र गोपाल भास्कर धोटे रा.उटी ता. मेहकर यांना सुद्धा रोजगार हमी योजनेतून विहिर मंजूर झालेली असताना त्यांना २0 मे २0१६ ला वर्क ऑर्डर मिळून सुद्धा त्यांनी कामाला कुठलीच सुरवात केलेली नाही; त्यांना मात्र दोन टप्प्यात वेगवेगळ्या तारखेला दोन चेकद्वारे विहिरीच्या कामाचे पैसे अदा करण्यात आले आहेत, अशी तक्रार शेषराव धोटे यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावरुन मेहकर पंचायत समिती अंतर्गत झालेल्या रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहिरी तसेच इतर कामांमध्ये मोठे गौडबंगाल झाल्याचे दिसून येत आहे.