राज्याच्या उपक्रमशील शिक्षकांच्या गटापासून पश्चिम वऱ्हाड दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:31 AM2021-03-07T04:31:52+5:302021-03-07T04:31:52+5:30

बुलडाणा : शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने मदत व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने राज्यातील उपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांचा विचार ...

West Varhad away from the group of enterprising teachers of the state | राज्याच्या उपक्रमशील शिक्षकांच्या गटापासून पश्चिम वऱ्हाड दूरच

राज्याच्या उपक्रमशील शिक्षकांच्या गटापासून पश्चिम वऱ्हाड दूरच

Next

बुलडाणा : शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने मदत व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने राज्यातील उपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांचा विचार गट स्थापन केला आहे. परंतु, पश्चिम वऱ्हाडामध्ये अनेक उपक्रमशील शिक्षक असूनही त्यांना या उपक्रमात स्थान देण्यात आलेले नाही. राज्याच्या उपक्रमशील शिक्षकांच्या गटापासून पश्चिम वऱ्हाडच दूर असल्यामुळे स्थानिक प्रतिभावंत शिक्षकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीनही जिल्ह्यांमध्ये उपक्रमशील शिक्षकांची कमी नाही. प्रत्येक केंद्रातील चार ते पाच शाळांमधून किमान दोन शिक्षक प्रतिभावंत आहेत. त्यातील काही शिक्षक तर नेहमीच चर्चेत असतात. राज्यातील अशा उपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांना घेऊन शिक्षण विभागाने एक गट स्थापन केला आहे. या गटाच्या मागे शिक्षण विभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मार्गदर्शन व्हावे, आणखी नावीन्यपूर्ण उपक्रम शिक्षण विभागात सुरू व्हावे, शिक्षण क्षेत्रात आवश्यक सुधारणा करणे, असा मूळ उद्देश आहे. एकूण ३० अधिकारी व शिक्षकांचा या गटामध्ये समावेश आहे. परंतु, पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांतील एकही शिक्षक किंवा अधिकाऱ्याला यामध्ये संधी देण्यात आलेली नाही. शिक्षण विभागाकडून वेळोवेळी अशा प्रकारचे गट स्थापन करताना विदर्भाला डावलण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक शिक्षक संघटनांमधून होत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षकांचाच सर्वाधिक भरणा

उपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांच्या विचार गटामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षकांचाच सर्वाधिक भरणा आहे. पुणे, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, सातारा, पालघर, नांदेड, अहमदनगर, अमरावती, वर्धा, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे जिल्ह्यांतील शिक्षक व अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

कोट...

पश्चिम विदर्भात अनेक प्रतिभावंत शिक्षक आहेत. परंतु, शिक्षण विभागाकडून वेळोवेळी जे अभ्यास गट तयार होतात, त्यामध्ये विदर्भातील शिक्षकांवरच अन्याय होतो. त्यांना अशा उपक्रमात संधी दिल्या जात नाही. पुणे, कोकण या भागातील शिक्षकांना घेऊन गट तयार केले जातात. हा कागदोपत्री खेळ असल्याबाबत शंका उपस्थित होत आहे.

मनीष गावंडे, राज्य अध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटना.

राज्यातील उपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांचा विचार गट स्थापन करण्यात आला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्याच्या वेगवेगळ्या भागातील उपक्रमशील शिक्षकांची या गटामध्ये निवड केलेली आहे. ही सर्व प्रक्रिया वरिष्ठ पातळीवरून होते.

सचिन जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.

Web Title: West Varhad away from the group of enterprising teachers of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.