माझ्या शाळेच्या गणवेशाचा रंग कोणता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 11:48 AM2021-06-23T11:48:38+5:302021-06-23T11:48:48+5:30

Education Sector News : माझ्या शाळेच्या गणवेशाचा रंग कोणता? असा प्रश्नच विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे. 

What color is my school uniform? | माझ्या शाळेच्या गणवेशाचा रंग कोणता?

माझ्या शाळेच्या गणवेशाचा रंग कोणता?

Next

- ब्रह्मानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येतो, परंतू नेहमीप्रमाणेच यंदाही शिक्षण विभागाच्या तिजोरीत गणवेशाच्या निधीसाठी खणखणाटच आहे. मुलांना वेळेवर गणवेश मिळत नाही, त्यात आता ऑनलाइन शिक्षण त्यामुळे माझ्या शाळेच्या गणवेशाचा रंग कोणता? असा प्रश्नच विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे. 
दरवर्षी विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव हा जुन्याच गणवेशावर होतो. त्यामुळे किमान अर्धे शैक्षणिक सत्र होईपर्यंत तरी, विद्यार्थ्यांना नव्या गणवेशाची वाट बघावी लागते. यंदाही शिक्षण विभागाची काही परिस्थिती वेगळी नाही. कोरोना विषाणू संसर्गामुळे मागील वर्षीप्रमाणेच यंदाही ऑनलाइनच शाळा राहणार आहे. जिल्ह्यात २८ जूनपासून नविन शैक्षणिक सत्रातील शाळा सुरू होणार आहेत. परंतू शाळेकडून विद्यार्थ्यांना मोफत दिल्या जाणाऱ्या गणवेशाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. समग्र शिक्षा अभियानाकडे गणवेशासाठी निधीच नाही. 


कोणाला दिला जातो मोफत गणवेश? 
जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व मुलींना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत दोन मोफत गणवेश दिले जातात. त्यानंतर इयत्ता पहिली ते आठवीतील अनुसूचित जाती जमातीतील मुलांनाही मोफत गणवेश दिला जातो.

पहिली, दुसरीतील विद्यार्थ्यांना गणवेशच माहित नाही 
कोरोना विषाणू संसर्गामुळे मागील वर्षीपासून ऑनलाइन शिक्षणच सुरू आहे. ऑनलाइन वर्गात कोणता गणवेश घातला याला महत्त्वच राहिलेले नाही. त्यामुळे मागील वर्षी आणि यावर्षीच्या पहिली, दुसरीतील विद्यार्थ्यांना आपल्या शाळेचा गणवेश कोणता आहे, हेच माहित नसल्याचे चित्र आहे.


समग्र शिक्षा अभियानाकडे सध्या गणवेशासाठी निधी उपलब्ध नाही. निधी प्राप्त होताच, शाळा स्तरावर थेट वितरण करण्यात येईल. 
-सचिन जगताप, 
प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.

Web Title: What color is my school uniform?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.