मोबाईल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 11:52 AM2021-06-06T11:52:41+5:302021-06-06T11:52:52+5:30
Buldhana News : जवळपास दीड महिना दुकाने बंद असल्यामुळे मोबाईलच्या दुकानांवरही नागरिक गर्दी करत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाचे संक्रमण काही प्रमाणात कमी झाल्यानंतर कठोर निर्बंधांमध्ये प्रशासनाने थोड्याप्रमाणात शिथिलता दिली आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या कामांसाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. यात मोबाईल दुरुस्तीच्या कामांचाही समावेश आहे. जवळपास दीड महिना दुकाने बंद असल्यामुळे मोबाईलच्या दुकानांवरही नागरिक गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचीही आता नागरिकांना भीती राहली नसल्याचे चित्र आहे. परंतु मोबाईल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको, याची जाणीव ठेवून संक्रमण टाळण्याचे प्रयत्न होण्याची गरज आहे.
मोबाईलचे वेड सध्या लहानांपासून मोठ्यांना आहे. मोबाईलमध्ये झालेली छोटी-मोठी खराबी, स्क्रीन गार्ड, बॅटरी बदलणे यासह नवीन मोबाईल घेण्यासाठी नागरिक, युवक वर्ग मोबाईलच्या दुकानात गर्दी करत आहे. त्यातून संक्रमण टाळण्यासाठी शारीरिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
प्रतिबंध हाच सुरक्षेचा प्रमुख उपाय आहे. मात्र त्यालाच बगल दिली जात असल्याचे एकंदरीत चित्र आहे. शेवटी मोबाईल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.
५५ दिवसांपासून दुकाने बंद
कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जवळपास ५५ दिवस मोबाईलचीही दुकाने बंद होती. आता त्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईल दुरुस्ती, नवा मोबाईल घेण्यासाठी ग्राहक दुकानात येत आहेत. सुरक्षित अंतर राखण्यासोबतच नियमांचे पालन करण्याच्या सूचना आम्ही सातत्याने देत असतो. बऱ्याचदा ग्राहकांकडून त्याकडे दुर्लक्ष होते. कोरोनाचा फटका आमच्या व्यवसायालाही बसत आहे.
- मयूर, मोबाईल व्यावसायिक
नव्यानेच नामांकित कंपनीत नोकरी लागली आहे. अद्याप कंपनीकडून लॅपटॉप मिळाला नाही. त्यामुळे मोबाईलवरूनच ऑनलाईन काम करत आहे. तो खराब झाल्यामुळे मोबाईल दुरुस्ती आवश्यक असल्याने मी आले आहे.
- कल्याणी मुळे
माझ्या भाच्याचे १४ जूनपासून ऑनलाईन एज्युकेशन सुरू होत आहे. त्यासाठी मोबाईल आवश्यक आहे. तो हँग होत असल्याने दुरुस्तीसाठी दुकानात आलो होताे. सुरक्षेची काळजी आम्ही घेत आहोत.
- संजय पानट