तढेगाव फाट्यावरील अरुंद रस्त्याने केला घात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:39 AM2021-08-21T04:39:48+5:302021-08-21T04:39:48+5:30
दुसरीकडे या अपघातामुळे आता मजुरांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. लोखंडी रॉडची वाहतूक करणाऱ्या या टिप्परमधून मजुरांची वाहतूक कशी ...
दुसरीकडे या अपघातामुळे आता मजुरांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. लोखंडी रॉडची वाहतूक करणाऱ्या या टिप्परमधून मजुरांची वाहतूक कशी काय केल्या जात होती हा ही एक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्या तपासात या बाबीवरही प्रकाश टाकेल. पण १३ कुटुंबाचे आधारस्तंभ या दुर्घटनेने हिसकावले आहे. ही हानी कदापिही भरून निघणारी नाही.
अपघाताचे वृत्त मिळताच सिंदखेड राजाचे तहसिलदार सुनील सावंत यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सोबतच समृद्धीच्या तढेगाव येथील कॅम्पमध्ये जाऊन तेथील एकंदरीत परिस्थितीचा आढावाही त्यांनी घेतला. सिंदखेडराजा येथील उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक सोमनाथ पवार हे आधीच घटनास्थळी पोहचले होते. दरम्यान,मदत कार्यात येणाऱ्या अडचणी दूर करून या सर्व अधिकाऱ्यांनी जखमींना उपचारासाठी जालना येथे पाठविण्याची व्यवस्था केली.
--आर्थिक मदतीसाठी प्रयत्न--
या अपघातातील मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना व जखमींना तात्काळ आर्थिक मदत देण्यासंदर्भात तहसील प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविले आहे. या संदर्भात वरिष्ठ स्तरावरून आदेश प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे तहसीलदार सुनील सावंत यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
--- चावरिया यांनीही दिली कॅम्पला भेट--
घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी तातडीने घटनास्थळ गाठून सविस्तर माहिती घेतली. तसेच मृत मजुरांचे कुटुंबीय राहत असलेल्या समृद्धीच्या साईट कॅम्पवर भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली.