कोरोना लसीचे कॉकटेल केले तर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:26 AM2021-06-01T04:26:01+5:302021-06-01T04:26:01+5:30
गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण कायम ...
गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण कायम आहे. त्यात लसींचा पुरवठाही होत नसल्याने लसीकरण काही दिवस बंद ठेवण्यात आले होते. कोरोनाशी लढण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने सी व्हिटॅमिनसारखी औषधे घेतली जात आहेत. परंतु, याच्याही पुढे जात सरकारने लस उपलब्ध करून दिली आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन आदी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या दोन प्रकारच्या लसी सर्वत्र देण्याचे काम सुरू आहे. जी व्यक्ती पहिला डोस ज्या कंपनीचा घेते, त्याच कंपनीचा त्याला दुसरा डोस देण्यात येतो. दुसरा डोस देताना पहिला डोस कोणत्या कंपनीचा आहे, हे रजिस्ट्रेशननुसार पाहिले जाते. त्यामुळे आजपर्यंत यात गोंधळ उडालेला नाही.
तज्ज्ञ डॉक्टर्स काय म्हणतात...
कोरोना लसीचा पहिला डोस वेगळा आणि दुसरा डोस वेगळा घेण्यास हरकत नसल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. मात्र असे केल्यास त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी एकाच कंपनीचे दोन्ही डोस घ्यावेत.
- डॉ. नीलेश टापरे, वैद्यकीय अधीक्षक,
उपजिल्हा सामान्य रुग्णालय, खामगाव.
कोरोना लसीचा पहिला डोस आणि दुसरा डोस वेगळा घेतला तरी त्याचे विपरित परिणाम होत नाहीत. मात्र आपल्याकडे एका व्यक्तीला पहिला डोस आणि दुसरा डोस एकाच कंपनीचा देण्यात येत आहे. सध्या उपलब्ध डोसनुसार लसीकरण करण्यात येत आहे.
- डॉ. प्रेमचंद पंडित,
वैद्यकीय अधीक्षक, सईबाई मोटे रुग्णालय, शेगाव.
एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळ्या कंपनीची लस घेतली, तर त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी एकाच कंपनीच्या लसीचे दोन डोस घेणेच योग्य आहे. कोव्हॅक्सिन २८ दिवसांनी, तर कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ८४ दिवसांच्या अंतराने घ्यावा.
- डॉ. शीतल चव्हाण, एम.डी. मेडिसीन.
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण...
पहिला डोस दुसरा डोस
ज्येष्ठ नागरिक : १२८७८९ ३९१८९
४५ ते ६० वयोगट : ११६२१० २८८१७
१८ ते ४४ : ९९७५