खिचडी शिजविणे, मुलांना वाटप करणे ही काय शिक्षकांची कामे झाली...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:58+5:302021-07-17T04:26:58+5:30

विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे, ज्ञान देणे हे शिक्षकांचे आद्यकर्तव्य आहे. परंतु, हे कर्तव्य सोडून शिक्षकांच्या पाठीमागे अनेक अशैक्षणिक कामे ...

What is the job of a teacher to cook khichdi and distribute it to children? | खिचडी शिजविणे, मुलांना वाटप करणे ही काय शिक्षकांची कामे झाली...?

खिचडी शिजविणे, मुलांना वाटप करणे ही काय शिक्षकांची कामे झाली...?

Next

विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे, ज्ञान देणे हे शिक्षकांचे आद्यकर्तव्य आहे. परंतु, हे कर्तव्य सोडून शिक्षकांच्या पाठीमागे अनेक अशैक्षणिक कामे लादली जातात. याबाबत अनेकदा शिक्षक, शिक्षक संघटनांनीसुद्धा आवाज उठविला. परंतु तो आवाज नेहमी शासनाकडून दाबला जातो आणि सातत्याने अशैक्षणिक कार्य करण्यास शिक्षकांना भाग पाडले जाते. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे काम, जनगणनेचे काम, शालेय पोषण आहाराची कामे शिक्षकांकडून सातत्याने करून घेतली जातात. आता तर याबाबत शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कार्यच करून घ्यायला हवेत, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल देताना कोर्टाने शिक्षण अधिकार अधिनियम २७ चा हवाला दिला आहे. अगोदरसुद्धा अनेक असे निर्णय झाले आहेत. परंतु शिक्षकांकडील अशैक्षणिक कार्य काही कमी झाली नाहीत. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तरी अशैक्षणिक कार्य काढून घेत, केवळ शिक्षणाचेच कार्य आमच्याकडून करून घेतले जाईल, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली.

शिक्षकांची कामे....

शालेय पोषण आहाराचे वितरण करणे, खिचडी शिजविणे

विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तयार करणे

शाळेचे बांधकाम, डागडुजी, रंगकाम करणे, कोरोना काळात चेक पोस्टवर कर्तव्य

रेशन दुकानांवर ड्युटी दिली. जनगणनेचे काम करणे, निवडणुकीच्या याद्या तयार करणे, निवडणूक केंद्रावर काम करणे

शिक्षण सोडून इतर कामांसाठीच प्रत्येक शाळेत किमान एक शिक्षक

शिक्षणाव्यतिरिक्त प्रत्येक शाळेत इतर कामांसाठी एक शिक्षक कार्यरत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, शिष्यवृत्तीचे अर्ज भरणे, शिक्षणाधिकारी कार्यालयातील शाळासंबंधीची कामे, शिक्षकांच्या वेतनासंबंधीची कामे यासोबतच मंत्रालयातील शाळासंबंधीची कामे, शैक्षणिक सुनावणी, सेवानिवृत्ती, पेन्शन, वेतन संबंधीची कामे शाळेतील एका शिक्षकाकडे देण्यात आली आहेत.

एक शिक्षकी शाळेचे हाल

जिल्ह्यात अनेक एक शिक्षकी शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच शिक्षकांना शाळेतील अनेक अशैक्षणिक कामे करावी लागतात. शालेय पोषण आहाराचे वितरण, खिचडी शिजवणे, शाळेची स्वच्छता करणे, मुलांसाठी पिण्याचे पाणी भरणे, कार्यालयीन कामकाज करणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्याची कामे शिक्षकाला करावी लागतात. त्यामुळे साहजिकच शैक्षणिक कामांकडे शिक्षकांचे दुर्लक्ष होते.

शिक्षकांचे पहिले कर्तव्य आहे, विद्यार्थ्यांना शिक्षण देणे, शिक्षकांनी त्यांची कर्तव्ये लक्षात घ्यावीत. राष्टीय कर्तव्यातही शिक्षक याेगदान देत असतात़ अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर व्हावा़

- प्रकाश मुकंद,

शिक्षणाधिकारी माध्यमिक.

शिक्षक संघटना काय म्हणतात?

कोरोना काळात शिक्षकांना चेक पोस्टवर, रेशन दुकाने, दारू दुकानांवर तैनात केले होते. निवडणुकीची कामे, जनगणनेची कामे करावी लागतात. शाळेत खिचडी शिजविण्याचे काम करावे लागते. अलीकडेच दापोली तालुक्यातील एका धरणावर शिक्षकांना तैनात केले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे शासनाने पालन करावे आणि शासनाने शिक्षकांची अशैक्षणिक कामांमधून मुक्तता करावी.

-दिलीप दांदडे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक महासंघ, बुलडाणा.

शिक्षकांकडे अनेक अशैक्षणिक कामे आहेत. याबाबत शिक्षक संघटनांनी अनेकदा आवाज उठविला आहे. आता उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. या निर्णयाचे शासनाने पालन करावे आणि शिक्षकांकडील खिचडी वाटपाची कामे, निवडणुकीसंबंधीची, याद्या तयार करण्याची कामे काढून घ्यावीत. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करावी. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची शासनाने अंमलबजावणी करावी.

-डी. डी. वायाल, अध्यक्ष जि. प. माध्यमिक संघ.

Web Title: What is the job of a teacher to cook khichdi and distribute it to children?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.