जे केले ते कायद्याच्या चौकटीतच केले : एकनाथ शिंदे
By निलेश जोशी | Published: May 12, 2023 05:16 PM2023-05-12T17:16:18+5:302023-05-12T17:16:28+5:30
मुख्यमंत्री झाल्यानंतर पांडुरंगाच्या पुजेचा मान, आता परमभक्त चोखोबाराय यांच्या दर्शनाचा लाभ
इसरूळ (जि. बुलढाणा): वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचे भूषण आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पांडुरंगाच्या पुजेचा मान मिळाला होता. आता त्यांचे परमभक्त संत श्री चोखोबाराय यांच्या मंदिराचे लोकार्पण आणि दर्शनाचा लाभ झाला. गेले काही महिने काय होईल, याचीच चर्चा होती. पण जे काही केल ते घटनेच्या चौकटीत कायदेशीर. बहुमताचा आदर आणि सन्मान असतो. त्यामुळे निकालही या भक्ताच्या बाजूने लागला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
बुलढाणा जिल्ह्यातील इसरुळ येथे श्री संत चोखोबाराय यांच्या मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, खा. प्रतापराव जाधव, आ. संजय रामुलकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, किरण सरनाईक, आ. नारायण कुचे, हरिभाऊ बागडे, माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख अेामसिंग राजपूत प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, इसरुळ येथे उभे राहिलेले हे मंदीर पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी किर्तनातून गोळा केलेल्या पैशातून उभे राहिले आहे. त्याचा आदर्श आज घेण्याची गरज आहे. किर्तनकार आपल्या प्रबोधनातून समाज जीवन प्रकाशमान करत असतो. सत्ताकारण, राजकारणाच्यावर संत परंपरा आहे. त्याचा आपणास अभिमान आहे.वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचे भूषण आहे. आजच्या कलीयुगात बॅलन्स (समतोल) राखण्याचे काम वारकरी संप्रदाय करत आहे. भक्ती साधनेच्या माध्यमतून हे साध्य होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातही संत परंपरेला महत्त्व होते. तेस आपल्या आयुष्यातही त्याला महत्त्व आहे. सत्ता स्थापनेपासून आम्ही घेतलेले सर्व निर्णय जनसामान्याच्या हिताचे आहेत. आपण मुख्यमंत्री नाही तर एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि पुढेही कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहू, असे ते पुढे म्हणाले.