दहावीच्या दाखल्यावर शेरा काय असाणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:35 AM2021-07-27T04:35:55+5:302021-07-27T04:35:55+5:30
दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला. आता प्रत्यक्ष गुणपत्रिका हातात कधी मिळणार, याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. ...
दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला. आता प्रत्यक्ष गुणपत्रिका हातात कधी मिळणार, याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. अंतर्गत मूल्यमापन पद्धतीमुळे यंदाचा निकाल दरवर्षीच्या निकालापेक्षा वेगळा आहे. त्यातच दहावी निकालाच्या गुणपत्रिका पुढील प्रवेशासाठी महत्त्वाची असल्याने, यंदाच्या निकालावर आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यावर नेमका काय शेरा शिक्षण विभाग किंवा शाळांकडून मिळणार, याची उत्सुकता पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आहे. दहावीच्या निकालानंतर शाळेतून दाखले काढण्याची आणि निकालाच्या गुणपत्रिका हातात पडण्याची गडबड असते. या कागदपत्रांच्या साहाय्याने पुढील व्यावसायिक, पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येत असल्याने, ही कागदपत्रे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. मागील वर्षी पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या निकालावर कोविड बॅचचा शिक्का येणार का, यावरून गदारोळ झाला होता. दहावी आणि बारावीच्या यंदाच्या राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द होऊन, त्यांचे मूल्यमापनही मागील वर्षाच्या आणि या वर्षीच्या अंतर्गत मूल्यमापनावर आधारित असल्याने, या निकालावर काय शिक्का येणार, याबाबत संभ्रम आहे. दरम्यान, निकाल हातात पडला नसल्याने, शिक्षण मंडळाकडूनही या बाबतीत सूचना नाहीत. मुलांच्या निकालावर किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असा काही शिक्का पडल्यास, ते त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी अडथळ्याचे ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया पालक देत आहेत.
दहावीच्या दाखल्यावर काय शेरा द्यायचा, याबाबत शिक्षण मंडळाकडून कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत. गुणपत्रिकांवर बोर्ड जे देईल त्याच सूचना व शेरा राहील. बोर्डाच्या सूचनांनुसार कार्यवाही होईल.
- प्रकाश मुकंद, शिक्षणाधिकारी, माध्यमिक.
मुख्याध्यापक म्हणतात...
अंतर्गत मूल्यमापन ही या कोरोनाच्या काळातील गरज होती. विद्यार्थ्यांच्या यंदाच्या आणि मागील अभ्यासाच्या निकालावरूनच त्यांचे मूल्यमापन झाले आहे. निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कोविडसंदर्भातील शेरे दाखल्यावर देण्याचा काही संबंध येतच नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी पुढील प्रवेशाच्या प्रक्रियेची तयारी करावी.
- कोल्हे, मुख्याध्यापक.
मूल्यमापनाचा निर्णय हा राज्य मंडळाचा असल्याने, त्यांनी शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असा काही शिक्का देणे योग्य नाही. यामुळे त्यांच्या आत्मविश्वासावर तर फरक पडेलच, शिवाय शैक्षणिक प्रक्रियेतही अडचणी येण्याची शक्यता आहे.
- शिवाजी बोंबटकार, पालक.
कोरोनाच्या काळात अर्थार्जनाचे मार्ग बंद झाल्याने, अनेक पालकांना यंदा शहर सोडून गावाकडे स्थलांतर करावे लागले आहे. त्यामुळे शाळा सोडण्यासारख्या महत्त्वाच्या दाखल्यावर किंवा गुणपत्रिकेवर असा काही शेरा देणे योग्य नाहीच. शिक्षण विभागाकडून याची खात्री केली जावी आणि विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणाचे मार्ग खुले ठेवावेत, अशी मागणी आहे.
- गणेश घुटे, पालक.
जिल्ह्यातील माध्यमिक शाळा - ६८१
दहावीतील एकूण विद्यार्थी- ४०९०८
पास झालेले विद्यार्थी - ४०९०४
मुले - २१२४५
मुली - १९६५९