बुलडाणा जिल्ह्यात यंदा गव्हाचे उत्पादन वाढणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 02:22 PM2020-02-21T14:22:54+5:302020-02-21T14:23:01+5:30
यंदा गहू पिकाच्या नियोजनाच्या तुलनेत ११३ टक्के पेरणी जिल्ह्यात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या अंतीम टप्प्यात झालेल्या पावसामुळे जलस्त्रोताची पातळी वाढली. त्यामुळे यंदा दरवर्षीपेक्षा रब्बी पिकांना सिंचनाची सोय चांगली झालेली आहे. सोबतच यंदा गहू पिकाच्या नियोजनाच्या तुलनेत ११३ टक्के पेरणी जिल्ह्यात झाली आहे. त्यामुळे गव्हाचे उत्पादन वाढण्याचे आशादायी चित्र सध्या दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षापासून पर्जन्यमान कमी राहिल्याने रब्बी पिकाला फटका बसत आहे. त्यात सर्वाधिक फटका हा गहू उत्पादनाला होत आहे. अत्यल्प पर्जन्यमानामुळे अनेक वेळा गव्हाला पाणी देण्याची व्यवस्था होत नाही. परंतू यंदा पाण्याची पातळी चांगली वाढल्याने गव्हाचे पीक चांगले आले आहे. आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील प्रकल्प १०० टक्क्यावर भरले. त्यामुळे रब्बी पिकाच्या पेरणीसाठी सुरूवातीला अडचणी गेल्या; परंतू पेरणी योग्य जमीनी झाल्यानंतर जानेवारी महिन्यात पेरणीचा आकडा झपाट्याने वाढला. जिल्ह्यात गहू पेरणीचे सरासरी क्षेत्र हे ६६ हजार ५०३ हेक्टर आहे. त्यापैकी सुमारे ७४ हजार ८२३ हेक्टर क्षेत्रावर गहू पेरणी झालेली आहे.
अमरावती विभागामध्ये सर्वाधिक गहू पेरा हा बुलडाणा जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात हरभरा पीक हे घाटे भरणे ते घाटे पक्वतेच्या अवस्थेत आहे. तर गहू पीक ओंब्या धरण्याच्या अवस्थेत आहे. सिंचनासाठी पाणी पुरेपूर असल्याने गव्हाला पाणी देण्यास अडचणी येत नाहीत. परंतू विद्युत पुरवठ्याचा तेवढा प्रश्न काही भागात आहे. परंतू गहू पिकाचे क्षेत्र वाढल्याने उत्पादनतही वाढ होण्याची शक्यता आहे.