जेव्हा खुद्द आमदार दारू अड्डय़ावर धाड टाकतात..!
By admin | Published: August 18, 2016 12:50 AM2016-08-18T00:50:05+5:302016-08-18T00:50:05+5:30
सिंदखेड राजा तालुक्यात अवैध दारूचा महापूर; राज्य उत्पादन शुल्क विभागाचे होणारे दुर्लक्ष आमदारांनी दारू अड्डय़ावर धाड टाकली.
चिखली (जि. बुलडाणा), दि. १७: दारूमुळे होणारे दुष्परिणाम, अवैध दारूमुळे होणारी जीवितहानी पाहता त्यास पायबंद घालणे राज्य उत्पादन शुल्काची जबाबदारी. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने सिंदखेड राजा तालुक्यात अवैध दारू विक्रीला उधान आले आहे. याची दखल घेत खुद्द आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी १७ ऑगस्ट रोजी अवैध दारू विक्री अड्ड्यावर धाड टाकल्याने शासकीय यंत्रणेसह अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
सिंदखेड राजा तालुका हा मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असल्याने मराठवाड्यातील जालना जिल्हय़ातून ही नामवंत कंपन्यांची बनावट दारू तालुक्यात दाखल होत असून, ही बनावट दारू म्हणजे स्लो पॉयझन असून, या दारूत वापरले जाणारे घटक प्रमाणित नसून, ती बनविण्याची प्रक्रियादेखील मान्यताप्राप्त नसल्याने त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटनाही घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा सर्व प्रकार राजरोस घडत असताना राज्य उत्पादन शुल्कला या बनावट दारूस आळा घालण्यात सपशेल अपयश आले आहे. तथापि पोलिसांचेही दुर्लक्ष असल्याची तक्र ार नागरिकांकडून होत असल्याने लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार डॉ.शशिकांत खेडेकर हे १७ ऑगस्ट रोजी राहेरी ते वर्दडी मार्गाने जात असताना उगले पांगरी फाटानजिक एका शेतात शेडनेटचे छत टाकून त्यामधे दारू व्रिक्रीचे अस्थायी दुकान थाटले असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. यावर आमदारांनी गाडी थांबवून स्वत: दारूच्या गुत्त्यावर गेले संबंधिताकडे दारू आहे का? अशी विचारणा केली असता तेथील दारू दारूविक्रेत्याने होकार दर्शवून चक्क दारू देण्याची लगबगदेखील चालविली. मात्र, थोड्याच वेळात समोरची व्यक्ती आमदार डॉ. शशिकांत खेडेकर असल्याचे समजताच त्याची चांगलीच पाचावर धारण बसली. दरम्यान, तेथून आ.डॉ. खेडेकर यांनी किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदारांना सदर प्रकाराची माहिती देऊन यापुढे कुठेच अवैध दारू विक्री करणारे आढळून येणार नाही, याची दक्षता घेण्याचे सांगितले. या घटनेमुळे अवैध दारूविक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.