मोटार चालू असताना पाइप काढला, पाय घसरल्याने तोल जाऊन विवाहिता विहिरीत पडली
By अनिल गवई | Published: May 10, 2024 03:15 PM2024-05-10T15:15:53+5:302024-05-10T15:17:47+5:30
हिंगणा शेत शिवारातील घटना : माहेरच्या नातेवाईकांना घातपाताचा संशय
खामगाव: विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका १९ वर्षीय विवाहितेने मोटार चालू असताना पाइप काढला. त्यावेळी पाय घसरल्याने तोल जाऊन विहिरीत पडल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना खामगाव तालुक्यातील हिंगणा शिवारात गुरूवारी घडली. पल्लवी संदीप कुल्हाड असे मृतक विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
गजानन सुखदेव कुल्हाड (२०), रा. नांद्री ता. खामगाव यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, त्यांची पत्नी पल्लवी ही हिंगणा शिवारातील शेषराव चव्हाण यांच्या शेतातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली. पाणी भरताना तिने अचानक मोटारचा पाइप काढला. त्यावेळी अधिक दाबामुळे तिचा पाय घसरून तोल गेल्याने ती विहिरीत पडली. पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले. या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक राची पुसाम करीत आहेत. याप्रकरणी संशय व्यक्त करीत मृतक विवाहितेच्या माहेरचे नातेवाईकांनी खामगाव ग्रामीण पोलीसांत धडक दिली. दरम्यान, यावेळी त्यांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्याअनुषंगाने पोलीसांचा तपास सुरू असल्याचे समजते.