महामार्गावरील विद्युतदिवे कधी उजाळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:23 AM2021-06-19T04:23:32+5:302021-06-19T04:23:32+5:30
चिखली : शहरातून जाणाऱ्या खामगाव ते जालना महामार्गाचे काम गत काही वर्षांपासून सुरू आहे. यअंतर्गत शहरातून जाणारा चौपदरीमार्ग सिमेंट ...
चिखली : शहरातून जाणाऱ्या खामगाव ते जालना महामार्गाचे काम गत काही वर्षांपासून सुरू आहे. यअंतर्गत शहरातून जाणारा चौपदरीमार्ग सिमेंट काँक्रीटने पूर्ण तयार झाला असून, स्थानिक मेहकर फाटा ते शेलूद या गावापर्यंत रस्त्याच्या मधोमध साजेशे व मुबलक प्रमाणात विद्युत पोल उभे करून त्यावर दिवेदेखील बसविण्यात आले आहेत. मात्र, वर्षभराचा कालावधी उलटूनही हे दिवे अद्याप उजळले नसल्याने, महामार्गावरील विद्युत दिवे उजाळणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जालना ते खामगावपर्यंत सिमेंट काँक्रीट महामार्गाअंतर्गत चिखली शहरातून जाणारा रस्ता पूर्णपणे तयार होऊन वर्षभराचा कालावधी उलटत आहे. नव्या कोऱ्या व चकचकीत अशा या रस्त्यावरून वाहने चालविताना पोटातले पाणी देखील हलत नाही. रहदारीसाठी हा रस्ता सुकर आहे. मानवी वस्ती व वर्दळीच्या ठिकाणी 'डिव्हायडर'मध्ये ठिकठिकाणी ठराविक अंतरावर विद्युत पोल उभारण्यात येऊन पथदिवे बसविण्यात आले आहेत. प्रमुख चौकात 'हायमास्ट' दिव्यांची व्यवस्था आहे. यांअर्तगत मेहकर फाटा ते चिखली शहर व बायपासमार्गे जिल्हा सहकारी बँकेजवळील चौफुली आणि पुढे शेलूद या नागरी वस्तीत पथदिव्यांची व्यवस्था आहे. या पथदिव्यांच्या उभारणीपश्चात मध्यंतरी पथदिवे व हायमास्ट दिव्यांची 'टेस्टिंग' झाली आहे. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे वर्षभराचा कालावधी उलटला असतानाही अद्याप रस्त्यांवरील हे दिवे उजळलेले नाहीत. त्यामुळे रहिवासी व पादचाऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
तरच शहराला झळाली मिळेल !
मेहकर फाटा ते शेलूद या सहा ते सात किमी अंतरावरील रस्त्यावर पथदिवे बसविण्यात आले आहेत. प्रमुख चौकांत मोठे पोल उभे करून हायमास्ट दिवे लावले. परंतु, अद्यापही या दिव्यांना वीज मिळाली नाही. हे दिवे उजळल्यास रात्रीला रस्त्यावरील अंधार दूर होण्यासह शहराला झळाळी प्राप्त होईल. याप्रकरणी संबंधित ठेकेदार व पालिका प्रशासन आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायतने समन्वयाने तोडगा काढणे आवश्यक आहे.
'रबलींग स्ट्रीप'ची गरज
चिखली शहरातून जाणारा हा महामार्ग बायपास असला तरी तो मानवी वस्तीतूनच आहे. मेहकर फाटा, शेलूद, पेठ, अमडापूर, उंद्री आदी गावांच्या मध्यभागातून हा रस्ता जातो. मात्र, नागरी वस्तीतूनही या महामार्गावरून वाहने सुसाट धावतात. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहनांचा वेग नियंत्रणात राहण्यासाठी नागरीवस्ती, रहदारी, चौक, शाळा, महाविद्यालय परिसरात रबलिंग स्ट्रीप टाकणे आवश्यक आहे.