आरोग्य कर्मचाऱ्यांना नुसताच 'मान'धन केव्हा मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:43 AM2021-07-07T04:43:24+5:302021-07-07T04:43:24+5:30
देशभरात जेव्हा कोरोनाचे आगमन झाले त्यावेळेस सर्व देशवासीयांच्या मनात प्रचंड भीती होती. त्यावेळेस कोविड रुग्णालयात काम करण्यास कोणीही धजावत ...
देशभरात जेव्हा कोरोनाचे आगमन झाले त्यावेळेस सर्व देशवासीयांच्या मनात प्रचंड भीती होती. त्यावेळेस कोविड रुग्णालयात काम करण्यास कोणीही धजावत नव्हते, अशा भयावह परिस्थितीत डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती करण्यात आली. स्वतःचा जीव धोक्यात घालून नाममात्र मानधनावर या आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. मात्र आता चार महिने उलटून गेले असतानाही अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतन दिले नाही. त्यामुळे डॉक्टर, परिचारिका, वाॅर्डबॉय, स्विपर, आदी आरोग्य कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
आरोग्य विभागाकडून दाखविल्या जातात त्रुटी
जिल्हा आरोग्याधिकारी बाळकृष्ण कांबळे यांच्याकडे कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी अनेक वेळा निवेदन दिले आहे. परंतु कागदोपत्री त्रुटी दाखविण्यात येऊन कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. रखडलेले वेतन मिळावे, यासाठी कर्मचाऱ्यांनी निवेदन देऊनही अंमलबजावणी होत नसल्याचे कर्मचाऱ्यांमधून सांगण्यात येत आहे.
कर्मचाऱ्यांनी मागितली आत्महत्येची परवानगी
जिल्ह्यातील कोविड सेंटर व जिल्हा सामान्य रुगालयातील एन. आर. एच. एम. अंतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतनही आरोग्य विभागाच्या हलगर्जीमुळे रखडले आहे. आता रखडलेले वेतन द्या, अन्यथा आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणीच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे कर्मचाऱ्यांनी केली आहे. कोविड कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोलकुमार गवई, प्रशांत ठेंग, अरुणकुमार शेळके, गोपाल पाटील, शेख इमरान, डॉ. ऋषीकेश देशमुख, पुष्कर शिंदे, विजय मोरे, गजानन नरवाडे, ज्ञानेश्वर पंखुले, प्रवीण बोरोडे यांनी हे निवेदन दिले आहे.
ही तर कर्मचाऱ्यांची थट्टा
जिवावर उदार होऊन कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मिळणारे मानधन तुटपुंजे आहे, परंतु तेही वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. संबंधित आरोग्य प्रशासनाकडून कोविड कर्मचाऱ्यांची थट्टाच केली जात आहे. मागील चार महिन्यांपासून कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन थकीत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
अमोलकुमार गवई,
जिल्हाध्यक्ष,
कोविड कंत्राटी कर्मचारी संघटना, बुलडाणा.
१३००
आरोग्य कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा