मेहकर नगर परिषदेच्या हद्दवाढीचा प्रश्न केव्हा सुटणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:30 AM2021-01-13T05:30:15+5:302021-01-13T05:30:15+5:30
मेहकर नगरपालिकेच्या वतीने हद्दवाढीचा प्रस्ताव मंत्रालयात २००१ पासून वेळोवेळी सादर करण्यात येत होता. खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ...
मेहकर नगरपालिकेच्या वतीने हद्दवाढीचा प्रस्ताव मंत्रालयात २००१ पासून वेळोवेळी सादर करण्यात येत होता. खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्यासह नगराध्यक्ष कासम गवळी, उपाध्यक्ष जयचंद भाटिया यांनी यासंदर्भात पाठपुरावाही केला होता. ३१ मे २०१९ रोजी मंत्रालयात नगरविकास विभागाचे सचिव बघान यांनी मेहकर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्यासोबत यासंदर्भात चर्चाही केली होती. हद्दवाढीच्या प्रस्तावातील काही किरकोळ त्रुटी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावेळी मुख्याधिकारी वायकोस यांनी किरकोळ त्रुटी पूर्ण करून नवीन प्रस्ताव मुंबईला पाठविले होते. आठ दिवसांच्या आत हद्दवाढीचा प्रश्न निकाली लागणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र वर्ष उलटले तरी अद्याप हा प्रश्न मार्गी लागलेला नाही.
विकासकामांकडे दुर्लक्ष
२०१६ मध्ये झालेल्या नगर परिषद निवडणुकीत शहरातील शिक्षक कॉलनी, गजानननगर, संताजीनगर, बालाजीनगर, चनखोरे कॉलनी आदी भागातील नागरिक हे नगर परिषदेच्या हद्दीत नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना न.प. निवडणुकीत मतदान करता आले नाही. शहरातील हे प्रभाग हद्दीत येत नसल्याने नगर परिषदेनेही या भागातील विकासकामांकडे दुर्लक्ष केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मेहकर हद्दवाढीचा प्रश्न महिन्याच्या आत मार्गी लागणार आहे.
डॉ. संजय रायमुलकर, आमदार मेहकर
मेहकर नगर परिषद हद्दवाढसंदर्भात पूर्ण त्रुटी दूर करण्यात आलेल्या आहेत. यामुळे हद्दवाढीसाठी आता काही अडचण निर्माण होणार नाही.
हाजी कासम गवळी, नगराध्यक्ष, नगर परिषद मेहकर
मेहकर नगर परिषद हद्दवाढीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याची माहिती आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार असल्याची शक्यता आहे.
संजय गाडे, मुख्याधिकारी, नगर परिषद मेहकर