शहराच्या हद्दीबाहेरील नागरिकांचा वाली कोण?

By admin | Published: May 15, 2017 12:08 AM2017-05-15T00:08:25+5:302017-05-15T00:08:25+5:30

नगरपालिकेने केली कर वसुली, मतदान मात्र जिल्हा परिषदेला : नागरी सुविधांसाठी कानावर हात

Who is the citizen of the city's outskirts? | शहराच्या हद्दीबाहेरील नागरिकांचा वाली कोण?

शहराच्या हद्दीबाहेरील नागरिकांचा वाली कोण?

Next

उद्धव फंगाळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : येथील शिक्षक कॉलनी, बालाजी नगर, पवनसुत नगर, तेजस्वी नगर व नवीन वस्ती या भागातील नागरिकांची अवस्था विचित्र झाली आहे. हा परिसर शहरात आहे; मात्र कागदोपत्री मेहकर शहराच्या हद्दीबाहेर करण्यात आला आहे. दुसरीकडे या भागातील नागरिकांकडून नगरपालिकेने कर वसुली केली आणि मतदान मात्र त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत करावे लागले. त्यामुळे या भागाचा विकास करायचा तर पालिका व जिल्हा परिषद हे दोघेही कानावर हात ठेवत आहेत. त्यामुळे आमचा वाली कोण, असा सवाल या नागरिकांचा आहे.
मेहकर शहरातील जानेफळ फाट्यापासून ते गजानन महाराज मंदिरापर्यंत गेल्या १० ते १२ वर्षांपासून नवीन वस्ती मोठ्या प्रमाणात तयार झाली आहे. या परिसरातील राहणाऱ्या नागरिकांनी आपली नावे नगरपालिकेच्या मतदान यादीमध्ये टाकून घेतलेली आहे. जवळपास ४ ते ५ हजारांच्या आसपास मतदार या भागात आहेत. या नागरिकांनी मागील दोन पंचवार्षिकमध्ये न.पा.च्या निवडणुकीत मतदान केले होते; परंतु यावर्षी या परिसरातील काही भाग नगरपालिकेने न.पा.च्या हद्दीबाहेर टाकल्याने नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना मतदान करता आले नाही; परंतु मतदानापासून वंचित ठेवता येत नसल्याने वंचित राहिलेल्या मतदारांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदान केले; मात्र या सर्व घडामोडीमध्ये या परिसराच्या विकासासाठी नगरपालिका किंवा जिल्हा परिषद कोणीही समोर यायला तयार नाही. नगरपालिकेच्या हद्दीत हा भाग नसला, तरी नळाचे पाणी, स्ट्रीट लाइट या दोन सुविधा नगरपालिकेकडून सुरुवातीपासूनच या भागाला मिळतात. इतर सुविधा मात्र हद्दीबाहेर या शब्दात अटकल्या आहेत. जे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य नागरिकांनी निवडून दिलेले आहे, ते सदस्य निवडणुका झाल्यापासून दिसेनासे झाले आहेत. तर हद्दीबाहेर असल्याने नगरसेवकही येथून काढता पाय घेत आहेत.
या परिसरात जे जुने रस्ते झाले आहेत, त्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मेहकरच्या काही भागात नवीन वस्ती झाली, त्या वस्तीत रस्तेच नाहीत. पावसाळा जवळ येत असल्याने या नागरिकांची मोठी पंचाईत होणार आहे. हद्दीबाहेर असलेला हा भाग कोणत्याही ग्रा.पं.ला जोडलेला नाही, तर नगरपालिकेमध्येसुद्धा नाही. त्यामुळे रस्ते व इतर विकासासाठी या परिसरातील नागरिकांनी नेमकी कोणाकडे मागणी करायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आजी-माजी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
हद्दीबाहेर गेलेल्या या परिसरातील नागरिकांनी खासदार, आमदार यांना मतदान केलेले आहे, तर माजी नगरसेवकांनासुद्धा मागील वेळेस मतदान केलेले आहे. त्यामुळे केवळ हद्दीबाहेर हा मुद्दा धरून या परिसरातील विकासाकडे दुर्लक्ष करणे हे कितपत योग्य आहे. निवडणुका आल्या, की या परिसरातील नागरिकांचा मतदानापुरता उपयोग करून घ्यायचा व नंतर हद्दीबाहेर आहे म्हणून विकासाकडे दुर्लक्ष करायचे, हे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आजी-माजी लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन सदर समस्या सोडविण्याची गरज आहे.

राजकारणातील गटबाजी नागरिकांसाठी डोकेदुखी
सध्या शिवसेना पक्ष थोड्याफार प्रमाणात सोडला, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या सर्वच पक्षात गटबाजी आहे. जो-तो आपला वेगळा गट तयार करून पक्षश्रेष्ठींसमोर वजन वाढविण्याच्या प्रयत्न करीत आहे. पक्षातील या गटबाजीमुळे नवीन वस्तीतील काही भाग हद्दीबाहेर गेलेला आहे. मात्र, या परिसरातील नागरिकांची स्थिती म्हणजे देवळातील घंट्यासारखी झाली आहे. राजकारणतील गटबाजी ही या परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

Web Title: Who is the citizen of the city's outskirts?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.