आम्ही राखी बांधायची कुणाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:37 AM2021-08-22T04:37:15+5:302021-08-22T04:37:15+5:30
बुलडाणा: बहीण-भावाच्या अतुट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस राखीपौर्णिमा २२ ऑगस्ट रोजी आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने अनेक ...
बुलडाणा: बहीण-भावाच्या अतुट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस राखीपौर्णिमा २२ ऑगस्ट रोजी आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने अनेक कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चार महिन्यांपूर्वी कुणाचा भाऊ, तर कुणाची बहीण कोरोनाने गेली. त्यामुळे या रक्षाबंधनाला आम्ही राखी बांधायची कुणाला? असा प्रश्न कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भाऊ गमावलेल्या बहिणींमधून राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला व्यक्त होत आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट फेेब्रुवारी २०२१ अखेरीस आली होती. मार्च ते मे दरम्यान दुसऱ्या लाटेने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख चांगलाच उंचावला होता. या लाटेत दिवसाला दीड ते दोन हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत होते. या लाटेत केवळ रुग्णांचाच आकडा वाढला नाही, तर कोरोनामुळे मृत्यूची संख्याही झपाट्याने वाढली होती. एका घरातील तीन ते चार लोकांचा कोरोनाने बळी घेतला. अनेक मुलांवरील आई वडिलाचे छत कोरोनात गेले. तर काहींनी भाऊ, बहीणही गमावली. बहीण भावाचा सण राखीपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला कोरोना काळात भाऊ गमावलेल्या एका बहिणीने आपल्या भावाच्या आठवणींना उजाळा दिला.
माझा भाऊ दरवर्षी माझ्या घरी यायचा
आतापर्यंतची एकही रक्षाबंधन अशी झाली नाही की ज्या रक्षाबंधनला माझा भाऊ माझ्या घरी आला नाही. माझे लग्न झाल्यापासून प्रत्येक रक्षाबंधनाला माझा भाऊ राखी बांधण्यासाठी माझ्या घरी येत होता; परंतु मे महिन्यात कोरोना कसा आला आणि माझ्या भावाला क्षणात घेऊन गेला, समजलेच नाही. यंदाची पहिलीच रक्षाबंधन आहे की माझा भाऊ माझ्यासोबत नाही.
एक बहीण.
कोरोनात आम्ही खूप काही गमावलं
आम्हाला सख्खी बहीण नव्हती. परंतु आमची आईच आमची बहीण बनून दरवर्षी राखी बांधायची. या कोरोना काळात आमची आई गेली आणि बाबाही. आम्हाला कुठलाच सण आता गोड लागत नाही. कोरोनात आम्ही खूप काही गमावलं आहे. आमच्या घराचे छतच कोरोना संसर्गाने हिरावून नेले असल्याची भावना बहिणीसारखी आई गमावलेल्या एका युवकाने लोकमतकडे राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला व्यक्त केल्या.
एकूण कोरोना पॉझिटिव्ह: ८७३६४
कोरोना मुक्त: ८६६४
मृत्यू: ६७२
उपचार घेत असलेले रुग्ण: २८