व्यायामशाळेचा फायदा नेमका कुणाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:36 AM2021-05-18T04:36:09+5:302021-05-18T04:36:09+5:30
अगोदर व्यायामशाळा या बहुउद्देशीय संस्थांना दिल्या जायच्या. यामध्येही राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात व्हायचा. जवळपासच्या लोकांना या शाळेंचा लाभ मिळायचा. ...
अगोदर व्यायामशाळा या बहुउद्देशीय संस्थांना दिल्या जायच्या. यामध्येही राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात व्हायचा. जवळपासच्या लोकांना या शाळेंचा लाभ मिळायचा. शासनाचा उद्देश जरी साफ असला, तरी मुळात मात्र हे संस्थाचालक ज्या उद्देशासाठी व्यायामशाळेची निर्मिती झाली त्याच कामांसाठी त्याचा उपयोग करतात का? हे तपासणे गरजेचे आहे. परिसरात अनेक व्यायामशाळा कागदावरच सुरू आहेत. काही ठिकाणी तर व्यायामशाळा बांधकाम न करता, साहित्य खरेदी न करता पैसे उचलून घेणे हा अपहार व शासन तसेच व्यायाम करणाऱ्या तरुणांची दिशाभूल होत आहे. संस्था अध्यक्षांकडून व्यायामशाळेचा वैयक्तिक स्वार्थासाठी उपयोग होताना दिसत आहे. त्यामुळे व्यायामशाळा विकास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या व्यायामशाळांचा नेमका फायदा कुणाला? शासनाच्या वतीने आता अलीकडे ग्रामपंचायतींना व्यायामशाळा बांधकामासाठी निधी दिला जात आहे. परंतु, काही गावे वगळता जवळपास सर्वच गावांमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त व्यायामशाळेचे अनुदान घेऊन बांधकाम पूर्ण झाले आहे. मग त्या शाळांना ग्रामपंचायतीच्या ताब्यात शासन का देत नाही? ज्या गावांमध्ये व्यायामशाळा नाही, त्या गावच्या ग्रामपंचायतीला निधी दिल्यास हरकत नाही. परंतु ज्या गावांमध्ये व्यायामशाळा आहे, त्या शाळेचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने ज्या गावांमध्ये अगोदर व्यायामशाळा दिलेल्या आहेत, त्या अगोदर सुरळीत चालू आहे का? याची चौकशी करण्याची मागणी युवकांमधून होत आहे. त्या व्यायामशाळा सुरळीत चालू करण्यात याव्यात किंवा ग्रामपंचायतींच्या ताब्यात देण्यात याव्यात, अशी मागणी समाधान देशमुख व गजेंद्र देशमुख यांनी केली आहे.