नदीच्या पुरात वाहून गेल्याने पत्नीचा मृत्यू, पती बेपत्ता
By विवेक चांदुरकर | Updated: July 9, 2024 22:53 IST2024-07-09T22:52:14+5:302024-07-09T22:53:49+5:30
हिंगणाकाझीचे पोलीस पाटील विनोद फासे यांनी या घटनेची माहिती मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्याला दिली...

प्रतिकात्मक फोटो...
देवधाबा : सुया, पोथ, मणी, विकण्यासाठी हिंगणाकाझी गावात गेलेली महिला व तिचा पती घराकडे परत येत असताना, हिंगणाकाझी गावाजवळ असलेल्या नदीच्या पुरात वाहून गेल्याची घटना ९ जुलै रोजी सायंकाळी घडली. महिलेचा मृतदेह सापडला असून, पतीचा शोध घेण्यात येत आहे.
देवधाबा येथील विमल सुभाष शिंदे (वय ५० वर्ष) ही महिला सुया, पोथ, मणी व इतर वस्तू विकण्यासाठी येथून ३ किमी अंतरावर असलेल्या हिंगणाकाझी गावात दुपारी गेली होती. देवधाबा व परिसरात जोरदार पाऊस पडल्याने तिला परत आणण्यासाठी पती सुभाष बर्मा शिंदे ( वय ५५) हे मोटार सायकल घेऊन गेले होते. हिंगणाकाझी येथून देवधाबा येथे येण्याकरिता निघाले असता, पतीने मोटारसायकल नदीच्या काठावर येऊन उभी केली. त्यांच्या मागे काही अंतरावर विमल शिंदे नदीपात्रातून येत असताना, वाहून जात असल्याचे सुभाष शिंदे यांना निदर्शनास पडले. त्यांनी पत्नीला वाचविण्यासाठी वाहत्या पाण्यात उडी घेतली असता दोघेही पती-पत्नी वाहून गेले. पती, पत्नी पुरात वाहून जात असल्याचे हिंगणाकाझी येथील नागरिकांना निदर्शनास पडले. त्यांनी आरडाओरडा केली. गावातील नागरिक शेख कलिम यांना विमलबाई पुराच्या पाण्यात वाहत येत असल्याचे दिसल्याने त्यानी पुराच्या पाण्यात उडी घेत महिलेला पुरातून बाहेर ओढत काठावर आणले. मात्र तोपर्यंत विमलबाई यांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. सुभाष शिंदे काठावरील नागरिकांना पुराच्या पाण्यात वाहून जात असताना दिसले. ते पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
हिंगणाकाझीचे पोलीस पाटील विनोद फासे यांनी या घटनेची माहिती मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्याला दिली. मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहचले मलकापूर महसूल विभागाचे कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारीही घटनास्थळी पोहचले असून, घटनेचा पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलिस करीत आहे.