प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या पत्नीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 02:14 PM2019-04-09T14:14:24+5:302019-04-09T14:17:00+5:30
बुलडाणा: प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या पत्नीस जिल्हा व सत्र न्यायालयाने ८ एप्रिल रोजी जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर सबळ पुराव्याअभावी प्रियकराची निर्दोष सुटका करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या पत्नीस जिल्हा व सत्र न्यायालयाने ८ एप्रिल रोजी जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर सबळ पुराव्याअभावी प्रियकराची निर्दोष सुटका करण्यात आली.
देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथील गणेश ढाकणे याची पत्नी अर्चना (वय २५) हिचे चुलत दीर विष्णू ढाकणे (वय २२ ) याच्यासोबत अनैतिक संबंध होते. पती घरी नसल्यावर ते दोघेही गुपचूप भेटायचे. पत्नीच्या अनैतिक संबंधाची पती गणेश ढाकणेला भणक लागली होती. त्यामुळे या कारणावरुन पती- पत्नीमध्ये नेहमी वाद होत असत. पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत गणेश याने त्याच्या आई -वडिलांनाही माहिती दिली होती. सर्वांनी मिळून अर्चनाची अनेकदा समजूतही काढली होती. दरम्यान ९ आॅक्टोंबर २०१६ रोजी पती- पत्नीमध्ये वाद झाल्याने अर्चनाने पतीस वायरने गळफास दिला. पती मृत पावल्याचे समजताच प्रियकर विष्णू ढाकणे यास घटनास्थळी बोलावले. दोघांनी मिळून गणेशचा मृतदेह हौदात टाकला. पतीला दारुचे व्यसन होते व गरमी झाल्याने हौदात बसला असता बुडून मृत्यू झाल्याचे पत्नीने दर्शविण्याचा प्रयत्न केला होता. अंढेरा पोलीस स्टेशनचे तत्कालिन ठाणेदार किशोर जुनघरे यांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी सखोल चौकशी केली. तर घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १० आॅक्टोंबर रोजी मृताचे वडील किसन ढाकणे यांनी पोलिसांत तक्रार दिली. सून अर्चना व पुतण्या विष्णू यांनी गणेशचा खून करुन मृतदेह हौदात टाकल्याचे तक्रारीत नमूद केले. त्यानुसार पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. चौकशीअंती पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयाने फिर्यादी, पंच, शवविच्छेदन करणारे चिखली ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी दाम्पत्य, चौकशी अधिकारी असे एकुण सात साक्षीदार तपासले. वादी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल अॅड. व्ही. एल. भटकर यांनी भक्कमपणे बाजू मांडली. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी आरोपी अर्चना ढाकणे हिला आजन्म कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. महिलेस दोन मुले आहेत.
परिस्थितीजन्य पुरावा ठरला महत्वाचा
अंढेरा येथील खूनप्रकरणात परिस्थितीजन्य पुरावा महत्वाचा ठरला. मृताच्या गळ्यावर आवळून मारल्याच्या खुणा होत्या. शवविच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी व साक्षीदारांचे पुरावे एकमेकांस सुसंगत होते. अर्चनाच्या चेहरा, कपाळ व डोक्यावर ओरबडल्याचे दिसून आले. मृतासोबत झालेल्या झटापटीत हा मार लागल्याचे न्यायालयात सिध्द झाले. जिल्हा सरकारी वकिल अॅड. भटकर यांचा युक्तीवाद व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली.)