कौटुंबिक कारणावरून पत्नीची गळा आवळून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 04:09 PM2020-09-04T16:09:45+5:302020-09-04T16:09:55+5:30
महिलेचे लक्ष्मी विकास घायाळ असे नाव आहे, तर विकास शेषराव घायाळ असे आरोपीचे नाव आहे.
लोणार : कौटुंबिक कारणावरून पत्नीचा शेतशिवारात गळा आवळून खून केल्याची घटना लोणार तालुक्यातील हिरडव परिसरात ३ सप्टेंबर रोजी घडली. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी फरार झाला असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.
या घटनेत मृत झालेल्या महिलेचे लक्ष्मी विकास घायाळ असे नाव आहे तर विकास शेषराव घायाळ असे आरोपीचे नाव आहे. तीन सप्टेंबर रोजी विकास घायाळ (रा. हिरडव) हा पत्नी लक्ष्मी व दोन मुलांसह दुचाकीवर बोरखेडी येथे सासुरवाडीत गेला होता. तेथून परतल्यानंतर त्याने हिरडव येथे घरी सात वर्षाची मुलगी व तीन वर्षाच्या मुलाला ठेवून पत्नीसह हिरडव परिसरातील शेत गाठले. तेथे पत्नी लक्ष्मीचा साडीच्या पदराने गळा आवळून खून करीत पलायन केले, अशी तक्रार मेव्हणे संतोष भास्कर शहाणे यांनी लोणार पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी विकास शेषराव घायाळ याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसात लोणार तालुक्यात दोन खुनाच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, विकास घायाळ यास मद्याचे व्यसन होते. त्यातून त्याचा वाद होत होता. परिणामी त्याच्या कुटुंबियांनीही गेल्या वर्षी पाच एकर शेती विकासच्या नावे करून दिली होती. त्यामुळे तो वेगळा राहत होता. दरम्यान, मद्याचे व्यसन त्यास असल्याने त्याचे मेव्हणे संतोष भास्कर शहाणे यांनी गावात नातेवाईकांना तीन सप्टेंबर रोजी फोन करून लक्ष्मी आणि विकास घायाळ पोहोचले का? याची विचारपूस केली होती. त्यावेळी मुले घरी खेळत असल्याचे नातेवाईकांनी त्यांना सांगितले होते. मात्र पती-पत्नी शेतात गेले असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र संतोष शहाणे यांना संशय आल्यामुळे त्यांनी नातेवाईकांना शेत शिवारात पाहण्यासाठी पाठवले असता साडीच्या सहाय्याने लक्ष्मीचा गळा आवळून खून केल्याचे निदर्शनास आल्याने हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. सध्या आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.
प्रकरणी संतोष भास्कर शहाणे (३२, रा. बोरखेडी, ता. लोणार) यांच्या तक्रारीवरून लोणार पोलिसांनी विकास घायाळ विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार रविंद्र देशमुख हे करीत आहेत.