बुध्दपौर्णिमेला वन्यप्रेमी करणार वन्यप्राण्यांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 03:43 PM2019-05-15T15:43:51+5:302019-05-15T15:43:56+5:30
बुलडाणा : गतवर्षीपासून शासनाने वन्यप्राणी गणना बंद केली असून आता वन्यप्रेमीच बुध्दपोर्णिमेला वन्यप्राण्यांची नोंद करणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गतवर्षीपासून शासनाने वन्यप्राणी गणना बंद केली असून आता वन्यप्रेमीच बुध्दपोर्णिमेला वन्यप्राण्यांची नोंद करणार आहेत. नोंदणी शुल्कही अर्धे कमी केले असून बुलडाणा व खामगाव विभागातून ३० जणांनी आॅनलाईन नोंदणी केली. वन्यप्राण्यांना जवळून बघता यावे याकरिता वन्यजिव विभागाने ज्ञानगंगा अभयारण्यात ३० मचान उभारल्या आहेत.
बुध्दपोर्णिमा जवळ आली की, वन्यप्रेमींना प्राणीगणनेचे वेध लागतात. परंतू गतवर्षीपासून शासनाने मेळघाटवगळता इतर अभयारण्यातील वन्यप्राणी गणना बंद केली. मात्र बुद्ध पौर्णिमेला वन्यप्रेमींना वन्यप्राणी बघण्याची संधी कायम ठेवली आहे. त्याकरिता नाममात्र ६१५ रुपये शुल्क ठेवले आहे. गतवर्षी ही रक्कम दीड हजार रुपये होती. सध्या जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून वन्यप्रेमींना परवडेल यानुसार ही रक्कम ठेवण्यात आली आहे. बुध्दपोर्णिमेच्या रात्री हे वन्यप्रेमीच वन्यप्राण्यांची नोंदणी करणार आहेत. वन्य प्रेमींना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी वनपाल, वनरक्षक व वनमजूर यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पर्यटकांची तपासणी करूनच त्यांना अभयारण्यात प्रवेश देण्यात येणार आहे. सर्व वन्यप्रेमींना रात्रीचे जेवण, पाणी व नाश्ता देण्यात येणार असल्याची माहिती बुलडाणा वन्यजिव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे यांनी दिली.
ज्ञानगंगा अभयारण्याचा २० हजार हेक्टरवर विस्तार आहे. अभयारण्याचा काही भाग खामगाव व काही भाग बुलडाणा वन्यजिव विभागाच्या कार्यक्षेत्रात आहे. प्राणी गणनेनिमित्त या अभयारण्यात बऱ्याच ठिकाणी कृत्रीम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. शासन आदेशानुसार या अभयारण्यातील प्राणी गणना होणार नाही. परंतु वन्य प्रेमींना प्राण्यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वन्यप्रेमी दिसणाºया वन्य प्राण्याची दिलेल्या प्रपत्रात नोंद करणार आहेत. पाणवठ्याच्या बाजूला असलेल्या झाडावर, काही ठिकाणी लाकडावर मचान तयार करण्यात आल्या आहेत. या मचानावर बसून वन्यप्रेमींना पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येणाºया वन्यप्राण्यांना बघता येणार आहे. यासाठी अभयारण्यातील बुलडाणा व खामगाव परिक्षेत्रात प्रत्येक १५ याप्रमाणे तीस मचान उभारण्यात आल्या आहेत.
(प्रतिनिधी)