‘वन्यजीव सोयरे’ जपतात वनांचे पूजन करण्याची पंरपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 01:56 PM2019-07-28T13:56:29+5:302019-07-28T13:56:42+5:30
ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीव सोयरेंकडून वनांचे पूजन करून वनसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : पर्यावरण संवर्धन आज काळाची गरज झाली आहे. त्यामुळे शासनस्तरावरून वृक्षलागवडीसारखे अनेक पर्यावरण पुरक कार्यक्रम राबविण्यात येतात. मात्र वनांचे पूजन करण्याची अनोखी पंरपरा येथील वन्यजीव सोयरे जपत असल्याचे दिसून येते. ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीव सोयरेंकडून वनांचे पूजन करून वनसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.
जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी व पर्यावरणाच्या संतुलनासाठी एकूण भूभागापैकी ३३ टक्के क्षेत्र हरित आच्छादनाखाली म्हणजेच वनांखाली असणे आवश्यक मानले जाते. मात्र, प्रत्यक्षात हे प्रमाण राखण्याऐवजी दिवसेंदिवस यातही घटच होत आहे. गेल्या २५ वर्षांत ३०० दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील वने तोडण्यात आली आहेत. वनसंवर्धन करने आजची गरज बनले आहे. प्रत्येक नागरिकाने वनांचे संवर्धन करायला हवे वन्यजीव सोयरे, बुलडाणा यांच्याकडून वनसंवर्धनासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. वन्यजीव सोयरेंकडून ज्ञानगंगा अभयारण्यात ५० झाडे, कलमा आणि बियांचे बीजारोपण करून वनांचे पूजन करून वनसंवर्धनाची शपथ घेण्यात आली. सुरुवातीला वन्यजीव सोयरे बुलडाणाच्या मार्गदर्शिका प्रा. डॉ. वंदना काकडे आणि प्रभावती चिंचोले यांच्या हस्ते वृक्ष पूजन तसेच वन पूजन करण्यात आले. या मोहिमेला वन्यजीव सोयरे धनंजय गवई, शशांक गवई, अभिषेक बाहेकर, अमित श्रीवास्तव, अनिल अंभोरे, एन. टी. परलकर प्रकाश डब्बे, मुकुंद वैष्णव, शाम राजपूत, नितिन श्रीवास्तव यांनी श्रमदान केले. या मोहिमेचे विशेष आकर्षण ठरले लहान वन्यजीव सोयरे अभिराम परळकर आणि कार्तिक परळकर. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वनांचे पूजन करून, वन संवर्धनाची शपथ घेण्याची पंरपरा गेल्या काही वर्षापासून वन्यजीव सोयरेंकडून जपली जात आहे.