पाणवठ्याअभावी वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:37 AM2021-05-20T04:37:08+5:302021-05-20T04:37:08+5:30
ज्ञानेश्वर म्हस्के अंढेरा : देऊळगाव राजा वनपरिक्षेत्र अंतर्गत मे महिना संपत आलेला असतानाही अनेक ठिकाणी पाणवठे तयार ...
ज्ञानेश्वर म्हस्के
अंढेरा : देऊळगाव राजा वनपरिक्षेत्र अंतर्गत मे महिना संपत आलेला असतानाही अनेक ठिकाणी पाणवठे तयार केले नसल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती हाेत आहे़ याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे़
देऊळगाव राजा वनपरिक्षेत्र अंतर्गत देऊळगावसह सिंदखेडराजा तालुके येतात़ दाेन्ही तालुक्यांच्या वनपरिक्षेत्रात ससा,हरिण,मोर,निलगाय,माकडे,असे मोठ्या संख्येने वन्य प्राणी मुक्तसंचार करतात .सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून तापमानाने चाळीशी पार केलेली आहे. रखरखत्या उन्हात अंगाची लाहीलाही होत आहे. वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे त्यांची भटकंती होत आहे. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात विहिरीत पडल्याच्या घटना घडत असताना यातून वनविभाग बोध घ्यायला तयार नाही.
शासनाच्या नियमाप्रमाणे मार्च महिन्यातच कृत्रिम पाणवठे बांधणे गरजेचे आहे़ देऊळगाव राजा वनपरिक्षेत्र अंतर्गत एकूण आठ वन बीट येतात. या आठ बीट मधून फक्त सातच बीटमध्ये फक्त एक-एक पाणवठेच वनविभागाने बनविले असून माळसावरगाव बीटमध्ये एकही पाणवठा वनविभागाने बनविला नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
देऊळगाव राजा वनपरिक्षेत्र अंतर्गत आठ बीटमध्ये सात पाणवठे बनवण्यात आले असून माळसावरगाव येथे दोन नैसर्गिक पाणवठे आहेत.
एस.एस.डुबे, वनपरिक्षेत्र अधिकारी, देऊळगाव राजा
वन्य प्राण्यांची पाण्यासाठी गावाकडे वाटचाल !
देऊळगाव राजा वनपरिक्षेत्र हे वनविभागाने संपन्न असून या भागात मोर,ससा,निलगाय,हरिण,माकड,यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वनविभागाच्या नाकर्तेपणामुळे रखरखत्या उन्हाळ्यात वन्य प्राण्यांना घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.पाण्याच्या शोधात वन्यजीव हे गावाकडे वाटचाल करत आहे.