अमडापूर परिसरात वन्य प्राण्यांचा हैदाेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:19+5:302021-07-10T04:24:19+5:30
अमडापूर : परिसरातील उंद्री, अमडापूर, इसोली परिसरात गत काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा हैदाेस वाढला आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त ...
अमडापूर : परिसरातील उंद्री, अमडापूर, इसोली परिसरात गत काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा हैदाेस वाढला आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करून तारेचे कुंपण करण्याची मागणी काॅंग्रेसने उपवनसंरक्षक अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
अमडापूर परिसरात खरीप हंगामातील पेरणी झाली असून, काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. दुबार व तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येऊन ठेपले आहे. अशातच काही ठिकाणी पिके तग धरून आहेत. या पिकांचे रोही, रानडुक्कर, हरीण व इतर वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. शेतकरी रात्रीचा दिवस करून जीवाची पर्वा न पिकांचे संरक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांचे हल्ले हाेण्याची भीती आहे. त्यामुळे या वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे, अन्यथा शेतकरी हितास्तव लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी चिखली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष समाधान सुपेकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव राम डहाके, सोसल मीडिया काँग्रेस विधानसभा अध्यक्ष प्रशांत बापू देशमुख व सहकारी उपस्थित होते.
नुकसानीच्या तुलनेत तुटपुंजी मदत
वन्य प्राण्यांकडून पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेते. मात्र, शेतकऱ्यांना शासनाकडून तुटपुंजी मदत देण्यात येते, तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्यास, त्यांनाही अल्प मदत देऊन बाेळवण केली जाते. त्यामुळे शासनाने मदतीची रक्कम वाढविण्याची मागणी हाेत आहे. या वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करण्याचा, तसेच तारेचे कुंपण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.