पंचवीस लाख युवा वॉरियर्स तयार करणार - बावनकुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:38 AM2021-08-24T04:38:59+5:302021-08-24T04:38:59+5:30
भाजपा युवा मोर्चाच्या वतीने राज्यात सध्या युवा वॉरियर्स शाखांचे उद्घाटन मोहीम राबविली जात आहे. १८ ते २५ वयोगटातील युवकांना ...
भाजपा युवा मोर्चाच्या वतीने राज्यात सध्या युवा वॉरियर्स शाखांचे उद्घाटन मोहीम राबविली जात आहे. १८ ते २५ वयोगटातील युवकांना भाजपशी जोडण्याचे हे महाअभियान असून यासाठी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कुचकामी असून, राज्यात अनेक प्रश्न आहेत. मात्र सरकारला काहीच घेणे-देणे नाही. मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत, तर उपमुख्यमंत्री हे केवळ पुण्याचे मंत्री असल्यासारखे वागतात. राज्य मंत्रिमंडळातील अन्य मंत्रीदेखील केवळ आपल्या मतदारसंघापुरते मर्यादित झाल्याची टीका बावनकुळे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या राज्यातील युवक एकत्र झाला असून युवकांच्या उत्तम भविष्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा यापुढे काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जे युवक राजकारणात थेट येऊ शकत नाही, अशा युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून युवा मोर्चासाठी काम करावे, असे आवाहन युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केले. यावेळी युवा मोर्चाचे सरचिटणीस राहुल लोणीकर, कार्यक्रमाचे आयोजक तथा भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार विजयराज शिंदे, तोताराम कायांदे, प्रभाकर मांते, विष्णू मेहेत्रे आदींची उपस्थिती होती.
युवकांची मोटारसायकल रॅली
चंद्रशेखर बावनकुळे व अन्य भाजपा नेते येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी युवा मोर्चाच्या वतीने मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. रेस्ट हाऊस ते जिजाऊ राजवाड्यापर्यंत झालेल्या या रॅलीत बावनकुळे व अन्य पदाधिकारी मोटारसायकलवरून राजवाड्यापर्यंत आले. जिजाऊंचे दर्शन घेऊन ते कार्यक्रम स्थळी गेले.