तलाठी चोपडेच्या विरोधात ‘एफआयआर’ दाखल करणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 01:54 PM2019-12-31T13:54:42+5:302019-12-31T13:54:54+5:30
मालमत्तेच्या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्याची आपली तयारी असल्याचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी येथे सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : हस्तलिखित सातबारा आॅनलाईन करताना बनावट नोंदीच्या आधारे निलंबित तलाठी राजेश चोपडे याने अनेकांनी फसवणूक केली आहे. शासकीय दस्तवेजासोबतही त्याने खाडाखोड केल्याचे चौकशीत उघड होत आहे. एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्याने हे कृत्य केल्याचे सिध्द होत आहे. त्यामुळे तलाठी राजेश चोपडेची पाठराखण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे निक्षून सांगतानाच त्याच्या विरोधात चौकशी पूर्णत्वास जाताच एफआयआर दाखल करण्यासाठी तक्रार दिली जाईल. त्याच्या मालमत्तेच्या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्याची आपली तयारी असल्याचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी येथे सांगितले.
खामगाव शहरातील प्लॉट खरेदी-विक्री घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार आणि निलंबित असलेल्या तलाठी चोपडे प्रकरणी गठीत चौकशी समिती संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या दालनात पत्र परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी चव्हाण म्हणाले की, तलाठी चोपडे याचे अनेक कारनामे साखळी पद्धतीने बाहेर येत आहे. सराईत गुन्हेगाराप्रमाणेच नियोजनबध्द कारनामे चोपडेने केले आहेत. इतकेच नव्हे तर शासकीय दस्तवेजाचे कागद फाडून काही ठिकाणी नवा कागद लावून तर काही ठिकाणी व्हाईटनर लावून आणि खाडाखोड हस्तलिखित सातबारा आॅनलाईन करताना ओडीओ प्रणाली वापरून अनेक प्लॉट धारकांचे मालक बदल बदलले. एक-दोन सातबारापर्यंत हा प्रकार थांबलेला नाही. तलाठी चोपडे याचे काळे कारनामे उघड करण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे तलाठी चोपडे विरोधात महसूल स्तरावर पोलिस तक्रार दाखल केली जाईल. त्याच्या मालमत्तेच्या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार केली जाईल. तसेच त्याची विभागीय चौकशी आणि बडतर्फ करण्याची कारवाई प्रस्तावित केली जाणार असल्याचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी पत्र परिषदेत स्पष्ट केले. तलाठी चोपडेची आयकर विभागाकडे तक्रार करण्यात आल्याचेही एसडीओ चव्हाण यांनी पत्र परिषदेत सांगितले. यावेळी प्रभारी तहसीलदार किटे, चोपडेच्या गैरप्रकाराच्या चौकशीसाठी गठीत समितीचे प्रमुख तथा नायब तहसीलदार विजयसिंह चव्हाण, मंडळ अधिकारी आर. डी.कुळकर्णी, जी.एस.कुळकर्णी, नितीन देशमुख, व्ही.डी. गावंडे, सूर्यकांत सातपुते आणि तलाठी ए.डी. डिवरे, डी.व्ही. शेळके, आर. एस.पल्हाडे, आर.एस. चौधरी यांची उपस्थिती होती.
मुळ मालकाला मालमत्ता मिळवून देणार!
चोपडेकडून फसवणूक झालेल्या मालमत्ता धारकांना न्याय देण्यासाठी आपण कटीबध्द आहोत. गृहनिर्माण सोसायट्यासह मुळ प्लॉट धारकांना त्यांची मालमत्ता मिळवून देण्याचे आपले प्रयत्न आहेत. फसवणूक झालेल्यांनी महसूल प्रशासनाकडे संपर्क साधावा, प्रत्येकाच्या शंकेचे निरसन केल्या जाईल. प्रत्येक तक्रारीचा दररोज निपटाराही करण्यात येईल. खामगाव साज्यातील मालमत्ता धारकांनी आपल्या मालमत्तांची खात्री करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी केले.