अफवा पसरविणाऱ्यांची गय करणार नाही - जिल्हाधिकारी सुमन चंद्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 03:56 PM2020-04-13T15:56:55+5:302020-04-13T15:57:02+5:30
जिल्ह्यात १३ ही तालुक्याच्या ठिकाणी कोवीड केअर सेंटर उभारणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
बुलडाणा: कोरोना संसर्गाची जिल्ह्यातील व्याप्ती रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क असून अफवा पसरविणाºयांची गय केली जाणार नाही. समाजमाध्यमांवर चुकीच्या पोस्ट व्हायरल करून अधिकारी अधिकारी, कर्मचाºयांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे प्रकार खपून घेतल्या जाणार नाही, अशी भूमिका जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी १३ एप्रिल रोजी स्पष्ट केली. दरम्यान, जिल्ह्यात १३ ही तालुक्याच्या ठिकाणी कोवीड केअर सेंटर उभारणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
रविवारी स्त्री रुग्णालयात क्वारंटीन करण्यात आलेल्या काहींनी तेथील असुविधेबाबत चित्रफीत सोशल मिडीयावर व्हायरल केली होती. यासंदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासंदर्भात जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्याशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी भेट घेतली असता त्यांनी ही बाब अधोरेखीत केली. संबंधीत प्रकारात प्रसंगी कारवाईही केल्या जावू शकते. मात्र पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यासंदर्भात संबंधितांना कल्पना दिली आहे. मात्र येत्या काळात असे प्रकार झाल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, असे त्या म्हणाल्या.
१३ कोवीड केअर सेंटर
जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात २०० बेड मर्यादेचे कोवीड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. शेगावच्या धर्तीवर ते उभारण्यात येणार आहे. त्यामुळे बुलडाणा येथील स्त्री रुग्णालयावर पडणारा ताणही कमी होईल. बुलडाणा येथे फक्त क्रिटीकल असणारेच रुग्ण आणल्या जातील. दुसरीकडे जिल्ह्यातील १६ कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तसेच या रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क कॉन्टॅक्ट व लो रिस्क कॉन्टॅक्ट असणारेही ट्रेस आऊट करण्यात प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे कम्युनीटी स्पेडचा धोका तुलनेने कमी असल्याचेही त्या म्हणाल्या. जिल्ह्याला सध्या तीन व्हेंटीलेटर मिळाले आहेत. आधीचे सात आहे. एकूण १२ व्हेंटीलेटरची मागणी आपण केली असून ते लवकरच उपलब्ध होतील, असे त्या म्हणाल्या.
‘त्या’ शहरास किती दिवस पाणी मिळते!
स्त्री रुग्णालयात पाण्यासह अन्य सुविधा नसल्याची ओरड करणाºयांच्या शहरात किती दिवस पाणी मिळते असा प्रतीप्रश्नही यासंदर्भात प्रासरमाध्यमांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी उपस्थित केला. कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांची प्रोटोकॉलनुसार योग्य काळजी घेतल्या जात असल्याचे स्पष्ट करत त्यांना योग्य सुविधा दिल्या जात असल्याचेही त्यांनी अधोरेखीत केले.