विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरून शिक्षकांचे मूल्यमापन होणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:27 AM2021-05-30T04:27:34+5:302021-05-30T04:27:34+5:30
बुलडाणा : विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील गुणवत्तेनुसार शिक्षकांच्या कामांचे मूल्यमापन करण्याच्या हालचाली शिक्षण विभागात सुरू आहेत. त्यासाठी शिक्षक प्रशिक्षण प्रणाली तयार ...
बुलडाणा : विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील गुणवत्तेनुसार शिक्षकांच्या कामांचे मूल्यमापन करण्याच्या हालचाली शिक्षण विभागात सुरू आहेत. त्यासाठी शिक्षक प्रशिक्षण प्रणाली तयार करण्याच्या निविदा विभागाकडून मागविण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरून शिक्षकांचे मूल्यमापन होणार का? याबाबत शिक्षकांमध्येही सध्या संभ्रम निर्माण झालेला आहे.
कोरोनामुळे वर्षभरापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेवरून वारंवार गोंधळ निर्माण होत आहे. त्यात आता भरीसभर शिक्षकांच्या मूल्यमापनाचा प्रश्नही समोर आलेला आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा किंवा चाचणीतील कामगिरीनुसार शिक्षकांचे मूल्यमापन करण्याबाबतच्या हालचाली शिक्षण विभागात सुरू आहेत. शिक्षकांचे मूल्यमापन करण्याची ही योजना राबविण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण प्रणालीची ३० कोटींची निविदा काढल्याने शिक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. दरम्यान, यासंदर्भात शिक्षकांचे व्हॉट्सॲप ग्रुप व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती पसरल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरीनुसार शिक्षकांचे मूल्यांकन कसे होणार? याबाबतचे अनेक प्रश्न शिक्षकांमधून उपस्थित होत आहेत.
--विविध संघटनांचा विरोध --
शिक्षण विभागाने शिक्षकांच्या प्रशिक्षण आणि मूल्यांकनासाठी स्वतंत्र प्रणाली तयार करण्याचे नियोजन केलेले आहे. त्यासाठी निविदा मागविल्या आहेत. शिक्षक, विद्यार्थी, शाळा यांची माहिती संकलित करणाऱ्या ‘सरल’ प्रणालीतील माहितीशी ही नवी प्रणाली जोडण्यात येईल. विद्यार्थिसंख्या, विद्यार्थ्यांचे गुण यांची नोंद नव्या प्रणालीत होईल. त्यानुसार त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन केले जाईल. त्यादृष्टीने प्रशिक्षण प्रणालीत विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचीही यंत्रणा असावी, अशी गरज निविदेत स्पष्ट करण्यात आली आहे. परंतु शिक्षण विभागाच्या या धोरणाला विविध संघटनांकडून विरोध होत आहे.
--कोट--
गुणवत्तेचा निकष लावायचे ठरले, तर सर्वच खात्यांना तो लावला पाहिजे. यात केवळ शिक्षकांनाच वेठीस धरण्यात येऊ नये. विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरीवरून शिक्षकांच्या मूल्यमापनाचे हे धोरण शिक्षण विभागाने तातडीने मागे घ्यावे. या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
-डी. डी. वायाळ, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती बुलडाणा.
--कोट--
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला शिक्षक हा एकच घटक जबाबदार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक, पालकाची परिस्थिती, भौतिक सुविधा असे अनेक घटक कारणीभूत असतात. केवळ विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या माध्यमातून वेतनवाढ थांबविणे किंवा शिक्षकांचे मूल्यांकन करणे योग्य नाही. शासनाने हे धोरण मागे घ्यावे, अशी संघटनांची आग्रही भूमिका आहे.
-सुनील मगर, जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती.
--कोट--
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरून शिक्षकांच्या मूल्यमापनाबाबतचे कुठलेही आदेश जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झालेले नाहीत. हा राज्य पातळीवरचा विषय आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून येणाऱ्या सूचनानुसारच अंमलबजावणी होईल.
-सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, बुलडाणा.
---
जिल्ह्यातील एकूण शिक्षक- १७९३३
जिल्हा परिषद शिक्षक- ६८७२
नगर पालिका शिक्षक - ७१३
खासगी अनुदानित - ५५८४