बुलडाण्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:59 AM2017-07-21T00:59:42+5:302017-07-21T01:02:10+5:30
पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : बदलत्या शहरीकरणामुळे बुलडाणा शहरात अनेक बदल झाले असून, जास्तीत-जास्त निधी आणून शहराचा सर्वांंगीण विकास करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले.
बुलडाणा नगर परिषदेच्या विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बुलडाणा शहराच्या नगराध्यक्ष नजमुन्निसा बेगम मो. सज्जाद, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उमाताई तायडे, जि. प. सभापती श्वेता महाले, धृपदराव सावळे, शिवसेना जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत, नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर पुढे म्हणाले की, बुलडाणा शहराशी माझा सुमारे ३५ वर्षांपासून संबंध असून, या कालावधीत शहरात अनेक बदल झाले आहेत. शहराचे नष्ट झालेले गतवैभव प्राप्त करून देत जिल्ह्यातील इतर शहराला दिशा देणारे शहर, अशी या शहराची ओळख निर्माण करण्यासाठी पुढील चार वर्षांचा विकास आराखडा तयार करा, तसेच शहरातील जी विकास कामे करावयाची आहेत त्याचे सविस्तर प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करा. सदर प्रस्ताव मंजूर करून विकास कामांसाठी जास्तीत-जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करणार. अनेक दिवसांपासून शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न असून नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरच सदर प्रश्न सोडविण्यात येईल, तसेच प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ हे अभियान प्रभावीपणे राबवावे. बुलडाणा शहराच्या इतिहासात प्रथमच नगराध्यक्ष पदावर एका महिलेची निवड झाली. ही शहरासाठी गौरवाची बाब आहे. शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांनी त्यांना सहकार्य करावे, असेही पालकमंत्री फुंडकर यावेळी म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष नजमुन्निसा बेगम मो. सज्जाद, जिप अध्यक्ष उमाताई तायडे, धृपदराव सावळे आणि जालींदर बुधवंत यांची समयोचित भाषणे झाली. पालकमंत्री फुंडकर यांनी २ कोटी २२ लाख रुपये निधीच्या दलित वस्ती सुधार योजना आणि ५० लाख रुपये निधीच्या रस्ते विकास कामाचे उद्घाटन केले. यावेळी नगर परिषदेचे सर्व सभापती, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.