वाईन बार झाले ‘फॅमिली रेस्टॉरंट’!
By admin | Published: April 5, 2017 11:40 PM2017-04-05T23:40:39+5:302017-04-05T23:40:39+5:30
सोनाळा- राज्य महामार्ग क्रमांक १९४ वरील सोनाळा परिसरातील वाईन बार मालकांनी शक्कल लढवित, फलकांवरील ‘वाईन बार’ खोडून त्याठिकाणी ‘फॅमिली रेस्टॉरंट’ असे केले आहे.
वाईन बार मालकांची नवी शक्कल : फलकांवरील वाईन बार खोडून रेस्टॉरंटचे फलक
सोनाळा : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटरच्या आत असणारी मद्य विक्रीमध्ये मोडता येणारे बीअर बार, वाईन बार, बीअर शॉपी पब, देशी-विदेशी दारू आदी मद्य विक्रीची सर्व दुकाने १ एप्रिलपासून बंद झाली आहेत. मात्र, परिसरातील वाईन बार मालकांनी शक्कल लढवित फलकावरील वाईन बार खोडून रेस्टॉरंट सुरू ठेवले आहेत. सोनाळा परिसरातील १९४ राज्य मार्गावरील असणारे मद्य विक्रीच्या दुकानाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी २ एप्रिलच्या मध्यरात्री चार वाईन बार व एक देशी दारू दुकानाला सील लावले.
सोनाळा-अकोट १९४ राज्य मार्गावर परिसरात चार वाईन बार व एक गावात असे पाच वाईन बार आहेत. यामधील वाईन बार मालकांनी दुकानासमोरील फलकावरील वाईन बार हा शब्द खोडून त्या ठिकाणी फॅमिली रेस्टॉरंट शब्दाची नवी शक्कल लढवून खाणावळ, भोजनालय सुरू केल्याने ग्राहक वर्ग भोजनालयात जाऊन भोजनाचा आनंद घेत असल्याचे चित्र सध्या तरी पहावयास मिळत आहे.
कायदा कितीही कठोर असला, तरी त्यामध्ये पळवाटा शोधतात, अशी चर्चा परिसरात रंगत आहे. काही फॅमिली रेस्टॉरंटमध्ये व्हेज व नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे भोजन मिळत असून, दारूला परिपूर्ण बंदी असल्याचे बार मालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. काही वाईन बार परिपूर्ण बंद असल्याचे दिसून येत आहेत.
वस्तीला लागूनच वाईन बार, देशी दारूचे दुकाने असल्याने वस्तीमधील नागरिकांना दारूड्याचा त्रास, बसस्थानक, शिवाजी वेस, वाल्मीक चौक, सायखेड वेस, पिंगळी वेस आदी परिसरातील नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागतो. दारूवर बंदी आल्याने थोडाफार दारुड्यांचा धिंगाणा कमी झाला आहे.
सोनाळ्यात जादा भावाने दारू विक्री
येथील देशी दारूचे दुकान बंद असल्याचा फायदा घेत काहींनी अवैधरीत्या दारू विक्री सुरू केली आहे. बावनबीर, जळगाव जामोद येथून दारू खरेदी केल्यानंतर या दारूची जादा भावाने सोनाळा येथे विक्री करण्यात येत आहे. तसेच जादा नफ्यापोटी दारूमध्ये भेसळ करण्यात येत आहे.
दारूकरिता बावनबीर रस्त्याने गर्दी
बावनबीर येथील देशी दारूचे दुकान शासनाच्या नियमातून बाद झाले आहे. सोनाळा, टुनकी, सायखेड, पिंगळी, सगोडा, बोरखेड, परिसरातील तळीराम दारू मिळण्यासाठी बावनबीर रस्त्याने पहावयास मिळत आहे. सोनाळ्यावरून बावनबीर चार कि.मी. रस्ता असल्याने तळीराम पायवारीने किंवा वाहनाने जाऊन आपली हौस फिटविताना दिसून येत आहेत.