ग्रंथालय चळवळ टिकल्याशिवाय नवी पिढी घडणार नाही - फुंडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:42 AM2017-12-01T00:42:00+5:302017-12-01T00:46:35+5:30
ग्रंथांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. ग्रंथ पिढी घडविण्याचे, सुसंस्कृत करण्याचे काम करतात. ग्रंथालय चळवळ टिकली नाही तर नव्या पिढीला देशाचा इतिहास आणि संस्कृती कळणार नाही, त्यामुळे ग्रंथालय चळवळ टिकली पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी गुरूवारी येथे व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ग्रंथांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. ग्रंथ पिढी घडविण्याचे, सुसंस्कृत करण्याचे काम करतात. ग्रंथालय चळवळ टिकली नाही तर नव्या पिढीला देशाचा इतिहास आणि संस्कृती कळणार नाही, त्यामुळे ग्रंथालय चळवळ टिकली पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी गुरूवारी येथे व्यक्त केली.
स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात दोन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून खा. प्रतापराव जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे, आ. डॉ. शशिकांत खेडेकर, जि. प. सदस्य ज्योती खेडेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे, सहायक ग्रंथालय संचालक ज. सु. पाटील, जिल्हा माहिती सहायक नीलेश तायडे, जिल्हा ग्रं थालय संघाचे अध्यक्ष कि.वा. वाघ, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव उपस्थित होते.
ग्रामीण भागात ज्ञानेश्वरी, संत तुकाराम महाराजांची गाथा, ग्रामगीतेचे सामूहिक वाचन केले जात असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले की, अशा विविध धार्मिक तसेच वैचारिक, सामाजिक ग्रंथांचे जतन ग्रंथालय चळवळीने केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वाचन चळवळ अधिक बळकट होणे गरजेचे आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून प्रशासन स्तरावर ग्रंथालय चळवळ संवर्धनाचे काम केले जात आहे.
खा. प्रतापराव जाधव म्हणाले की, आयुष्यात पुस्तकांचे महत्त्व मोठे असून, ग्रंथ हे गुरु समान आहेत. ग्रंथ जीवनाला दिशा देण्याचे काम करतात. त्यामुळे ग्रंथालय व वाचन संस्कृती टिकणे महत्त्वाचे आहे. जि. प. अध्यक्ष उमा तायडे यांनी प्रत्येक गावात ग्रंथालयाची गरज आहे. त्यामुळे गावागावात ग्रंथालय उभारली पाहिजेत, असे सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार म्हणाले की, सध्या मोबाइल युग आहे. सर्वच बाबी मोबाइलवर पाहिल्या जातात, अगदी पुस्तकही मोबाइलवर वाचली जातात; परंतु प्रत्यक्ष हातात घेऊन पुस्तक वाचनाचा फायदा अधिक होतो. नवीन पिढी पुस्तकांना विसरली तर भविष्यकाळ कठीण राहील, असे ते म्हणाले. जिल्हा ग्रंथपाल सतीश जाधव यांनी ग्रंथोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली.
ग्रंथदिंडीत थिरकली पावले
ग्रंथोत्सवानिमित्त सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. यामध्ये साहित्यप्रेमी जन तेची पाऊले थिरकली. नगराध्यक्ष नजमुन्नीसा बेगम मो. सज्जाद यांच्या हस्ते ग्रंथपूजन करुन ताराबाई शिंदे यांच्या वाड्यापासून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाल्यानंतर ही ग्रंथदिंडी मार्गस्थ झाली. ग्रंथदिंडी मुख्य बाजार लाइन, जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेट बँक चौक या मार्गे गर्दे सभागृहात पोहोचली. दरम्यान, भजनी मंडळांनी विविध भजने, भारुडे सादर केली. पारंपरिक पाऊली आणि फुगडी कलेचेदेखील सादरीकरण करुन नागरिकांचे लक्ष वेधले.