अध्यात्माशिवाय विज्ञानाची प्रगती अशक्य!- चंद्रकांत शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 05:44 PM2019-09-21T17:44:51+5:302019-09-21T17:46:05+5:30
थिआॅसॉफिकल सोसायटीचे आंतरराष्ट्रीय व्याख्याते प्रा. चंद्रकांत शिंदे यांच्याशी साधलेला संवाद.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : विज्ञान आणि अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विज्ञानाची प्रगती ही अधात्माशिवाय होवू शकत नाही. विश्वबंधुत्वाचा विचार जनमाणसात रूजणे गरजेच आहे. त्यासाठी संत महात्म्यांच्या विचारांचा अंगिकार करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने थिआॅसॉफिकल सोसायटीचे कार्य सुरू आहे. थिआॅसॉफिकल सोसायटीचे आंतरराष्ट्रीय व्याख्याते प्रा. चंद्रकांत शिंदे यांच्याशी साधलेला संवाद.
थिआॅसॉफिकल सोसायटीचे प्रमुख उद्देश काय?
- जात, धर्म, लिंग भेद आड येऊ न देता मानव जातीला विश्वबंधुत्वाचे केंद्र बनविणे, हा प्रमुख उद्देश या सोसायटीचा आहे. त्याचप्रमाणे तत्वज्ञान, विज्ञान आणि धर्म या त्रिसुत्रीचा तुलनात्मक अभ्यास करून भौतिक सृष्टीनियम व मानवाच्या अंतशक्तीचे संशोधन करणे हे प्रमुख उद्देश या सोसायटीचे आहेत. मानव जातीच्या कल्याणासाठी गत १५० वर्षांपासून ही संस्था कार्यरत आहे.
थिआॅसॉफिकल सोसायटीचे सभासद होण्यासाठी काय करावे?
- जगभरात ५८ देशात १५० शाखा असलेल्या थिआॅसॉफिकल सोसायटीचा विश्वबंधुत्वाची जोपासना हाच एकमेव उद्देश आहे. विश्वबंधुत्चाची जोपासना करणाºया कोणत्याही व्यक्तीला थिआॅसॉफिकल सोसायटीचे सभासद होता येते.
थिआॅसॉफिकल सोसायटीचे आंतरराष्ट्रीय व्याख्याते म्हणून आपण कोठे भेटी दिल्यात?
- सन १९७५ साली आपण थिआॅसॉफिकल सोसायटीचे सभासद झालो. त्यानंतर राष्ट्रीय व्याख्याते म्हणून देशभर तर आणि आता आंतरराष्ट्रीय व्याखाते म्हणून अमेरीका, नेदरलॅन्ड, श्रीलंका या देशात आपली व्याखाने झाली आहेत. अकोला आणि खामगाव येथील व्याखानालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. थिआॅसॉफीच बीज भारतात रूजविण्यासाठी सन १९७९ मध्ये भारतीय थिआॅसॉफिकल सोसायटीची सुरूवात महाराष्ट्रातील मुंबई येथे झाली. महाराष्ट्रातील थिआॅसॉफिकल सोयायटीचे स्वामी दयानंद सरस्वती सभासद होते. भारतच नव्हे तर संपूर्ण जगात शांतता आणि बंधुभाव नांदावा यासाठी थिआॅसॉफिकल ही सोसायटी महत्वपूर्ण कार्य करते.
थिआॅसॉफिकल सोसायटीची स्थापना कधी व कोठे झाली?
- अध्यात्म व विज्ञान यांचा तुलनात्मक अभ्यास, योग विद्येचा प्रचार, प्रसार व संपूर्ण जगाला बंधुत्वाची (वसुधेव कुटुंबकम ) ,शांतीची शिकवण देण्यासाठी रशिअन महिला हेलेना पेट्रोव्होना ब्लाव्हटस्की व अमेरिकेतील कर्नल हेनरी स्टील आॅलकॉट या दोघांनी एकत्र येउन १७ नोव्हेंबर १८७५ रोजी अमेरिकेतील न्यूयार्क येथे थिआॅसाफिकल सोसायटी ची स्थापना केली.भारत हि मुळात अध्यात्मिक भूमी असल्यामुळे १८८२ मध्ये थिआॅसाफिकल सोसायटीचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय भारतात चेन्नई येथे (अड्यार) येथे स्थानांतरीत करण्यात आले.