साक्षीदारालाच बनविले प्लॉटचे मालक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 03:22 PM2020-01-12T15:22:39+5:302020-01-12T15:22:55+5:30
चोपडे विरोधात महसूल प्रशासन आणि इतर दोन तक्रारींवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: खामगाव महसूल मंडळातील भाग-१ चा तलाठी राजेश चोपडे याने प्लॉट-विक्रीसाठी मुळ मालक बदलविताना एका प्लॉटमध्ये साक्षीदार असलेल्या व्यक्तीला दुसऱ्या प्लॉटचा मालक बनविल्याची धक्कादायक बाब समोर आले आहे. त्यामुळे निलंबित तलाठी चोपडे विरोधात आणखी तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. चोपडे विरोधात महसूल प्रशासन आणि इतर दोन तक्रारींवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
खामगाव भाग-१ चा तलाठी चोपडे याने त्याच्या कार्यकाळात मुळ हस्तलिखीत ७/१२ मध्ये बनावट नोंदी केल्या. या बनावट नोंदी करून त्या आधारे संगणकीकृत ७/१२ तयार केलेत. त्यानंतर शहराच्या विविध भागातील सुमारे शंभरपेक्षा जास्त प्लॉटची खरेदी-विक्री केली. हा घोळ करताना गट क्रमांक ११५ मध्ये एका प्लॉटच्या विक्रतीत साक्षीदार असलेल्या इसमाला चोपडेने दुसºया प्लॉटचे मालक बनविले. इतकेच नव्हेतर आपल्या मर्जीतील एक टोळी तयार करून प्लॉटची विक्री केली. यामध्ये शिवाजीराव देशमुख यांना वारसा हक्काने मिळालेला प्लॉट देखील चोपडेने बनावट दस्तवेज बनवून विकला. त्यामुळे शिवाजीराव देशमुख यांच्यावतीने त्यांचे पुत्र देवेंद्र देशमुख यांनी तलाठी राजेश चोपडे यांच्यासह ५ जणांविरोधात शुक्रवारी शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. यामध्ये शिवाजीराव देशमुख यांच्या मालकीचा असलेला प्लॉट शैलेश श्रीकृष्ण चोपडे यास गैरकायदेशीर खरेदीखत अस्तित्वात आणून विकल्यामुळे आरोपी विरोधात कारवाईची मागणीही देशमुख यांनी तक्रारीत केली आहे.
मुख्याध्यापकाला १५ लाखा गंडा!
बनावट प्लॉटच्या विक्रीतून चोपडेने एका मुख्याध्यापकाला सुमारे १५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. गजानन नगर, यशोधरा नगर भागातील एका प्लॉटच्या विक्रीतून चोपडेने या मुख्याध्यापकाला १५ लाखाचा चुना लावल्याची माहिती समोर आली आहे.
गोपाळकृष्ण सोयायटीतील अनेक प्लॉट विकले!
शेगाव रोडवरील गोपाळकृष्ण गृहनिर्माण संस्थेतील ८ ते १० प्लॉट चोपडे आणि त्याच्या साथीदारांनी मालक बदलवून विकल्याची धक्कादायक बाब शुक्रवारी उघडकीस आली. या सोसायटीतील आणखी प्लॉट विकल्या गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
निलंबित तलाठी चोपडे यांने अनेकांची फसवणूक केली आहे. शहरातील प्लॉट खरेदी विक्रीचा मोठा घोटाळा असल्याने चोपडेची मालमत्ता जप्त करावी. तसेच त्याच्या साथीदारांनाही अटक करावी. अतिशय गुंतागुंतीचा हा विषय असल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत याप्रकरणी तपास करण्यात यावा.
- देवेंद्र देशमुख
तक्रारकर्ते, खामगाव.